धाराशिव, दि. २२ जून २०२६ : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना तसेच अंगीकृत संघटनांच्या विद्यमान कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्यानंतर लगेचच हा निर्णय झाल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयातून जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना, युवा कार्यकर्त्यांना आणि तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांना संधी देण्याचे धोरण स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी काळात नव्या कार्यकारिण्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक सक्षम आणि व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नव्या कार्यकारिण्यांच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचा नव्या संघटनात्मक रचनेत पूर्वीप्रमाणे प्रभाव आणि वरचष्मा कायम राहणार का, की खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील नेतृत्वाच्या समीकरणांमध्ये बदल होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नव्या कार्यकारिण्यांच्या घोषणेनंतरच जिल्ह्यातील पक्ष संघटनेतील नेतृत्वाचे नवे समीकरण आणि विविध गटांचे प्रतिनिधित्व स्पष्ट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आगामी नियुक्त्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













Users Today : 7
Users Yesterday : 89
This Month : 637
Total Users : 38612