कळंब नगर परिषदेत राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवल्यानंतर भाजपने आता धाराशिव नगर परिषदेवर लक्ष केंद्रित केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पाच नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून, त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होऊ शकतो, अशी माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. या संपूर्ण घडामोडींमागे युवा नेते मल्हार पाटील यांनी प्रभावी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा असून, त्यामुळे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
कळंबमध्ये नगरसेवकांचे प्रवेश घडवून आणल्यानंतर धाराशिवमध्येही तशीच राजकीय खेळी आकार घेत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित नगरसेवकांच्या काही राजकीय अपेक्षा, भविष्यातील पदांची संधी आणि विकासकामांबाबतची आश्वासने या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र या बाबींची संबंधित नगरसेवक किंवा भाजपकडून अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने सध्या या चर्चांकडे राजकीय हालचाली म्हणूनच पाहावे लागणार आहे.
‘वाटा’च्या राजकारणाला ‘वन टाइम सेटलमेंट’?
या संभाव्य पक्षांतरामागे केवळ संख्याबळ वाढविणे एवढाच उद्देश नसून, आगामी काळातील विकासनिधी आणि स्थानिक सत्ताकारणाचे गणितही दडले असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात तर याला गंमतीने ‘वन टाइम सेटलमेंट’ असे संबोधले जात आहे.
दरवर्षी विकासकामे, निधीचे वाटप आणि त्यातून निर्माण होणारे राजकीय मतभेद यांचा सामना करण्यापेक्षा प्रमुख स्थानिक शिलेदारांना थेट आपल्या गोटात आणणे हा अधिक सोपा पर्याय भाजपने स्वीकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे “सदस्य आपल्या बाजूला तर विकासाचे गणितही आपल्या हातात” अशी नवी राजकीय पद्धत आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
ओमराजेंसमोर नवे राजकीय आव्हान
या घडामोडी शिवसेना उबाठासाठी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच त्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठीही राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जात आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेनंतर उबाठाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी किंवा नगरसेवकांनी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र धाराशिवमधील पाच नगरसेवक भाजपकडे वळल्यास हे गणित पूर्णपणे बदलू शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या हीच पुढे विकासकामे, निधी आणि जिल्हास्तरीय राजकीय प्रभावासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे “जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषदेत आपले सदस्य दाखवा आणि मगच विकासकामातील वाट्याची चर्चा करा,” असे नवे राजकीय समीकरण निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
स्पष्ट बहुमत असूनही भाजपची मोर्चेबांधणी का?
विशेष म्हणजे, सत्ताधाऱ्यांकडे आवश्यक संख्याबळ असतानाही विरोधी गटातील नगरसेवकांना आपल्या बाजूला खेचण्याची धडपड सुरू असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही केवळ पक्षविस्ताराची मोहीम आहे की पुढील काही वर्षांत जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय नियंत्रण मिळविण्याची दीर्घकालीन रणनीती, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
कळंबमध्ये झालेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर धाराशिवमध्येही तोच फॉर्म्युला वापरला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच सवाल विचारला जात आहे—
“मल्हार पर्व कळंबपुरतेच मर्यादित राहणार, की धाराशिव नगर परिषदेतही कमळाची नवी पाकळी उमलणार?”
संबंधित पाच नगरसेवकांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतरच या चर्चेचे वास्तव स्पष्ट होईल; मात्र सध्या तरी धाराशिवच्या राजकारणात ‘पाच नगरसेवक’ हेच सर्वाधिक चर्चेचे केंद्र बनले आहेत.











Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514