धाराशिवच्या राजकारणात नवा ट्विस्ट; चार नगरसेवकांसह सहा जणांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव शहराच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला अखेर मोठा ट्विस्ट मिळाला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असलेले धाराशिव नगरपालिकेतील नगरसेवक अखेर शिवसेनेत दाखल झाले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रात्रीत राजकीय गेम फिरवल्याची चर्चा आता शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर, तसेच अमित उंबरे व ज्ञानदेव करवर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला.
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव नगरपालिकेतील काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असल्याची चर्चा होती. पक्षप्रवेशासाठी हालचालीही सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि संबंधित नगरसेवकांनी भाजपऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली.
या घडामोडीमागे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेवर असल्याचे मानले जाणारे नगरसेवक थेट शिवसेनेत गेल्याने धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण निर्माण झाले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नगरसेवकांच्या सहभागामुळे धाराशिव शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या पक्षप्रवेशावेळी सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश भैय्या मगर आणि सह्यादी राजेनिंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपला धक्का, शिवसेनेला बळ
धाराशिव नगरपालिकेच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना अचानक झालेल्या या पक्षप्रवेशामुळे “अखेरच्या क्षणी नेमकी कोणती राजकीय खेळी झाली?” याची चर्चा आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.











Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514