भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) : राजकारणात मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही आपल्या कार्यकर्त्यांशी आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवणे हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असते. याचाच प्रत्यय भूम तालुक्यातील छोट्याशा वंजारवाडी गावात पाहायला मिळाला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत अक्की उर्फ अक्षय बर्वे यांच्या नव्या वास्तूच्या वास्तुशांती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता म्हणून पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख अधोरेखित केली.

वंजारवाडी येथील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अक्की बर्वे हे आज सोशल मीडिया, ग्राफिक डिझाईन आणि डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. उत्कृष्ट दर्जाचे ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि राजकीय-सामाजिक डिजिटल कंटेंट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील अनेक नेते व पदाधिकाऱ्यांसाठी काम केले आहे.
मात्र अक्की बर्वे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली नसून, सचिन बाबर यांच्या माध्यमातून दोघांची प्रथम ओळख झाली. त्यानंतर कामाच्या निमित्ताने या ओळखीचे रूपांतर विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्यात झाले. अक्की बर्वे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे काम केले आणि हे नाते केवळ व्यावसायिक न राहता व्यक्तिगत जिव्हाळ्याचे बनले.

अक्की बर्वे यांच्याकडे विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांची कामे येत असली, तरी वैयक्तिक संबंध बिघडतील किंवा आपल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कामे केवळ आर्थिक फायद्यासाठी स्वीकारायची नाहीत, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली. अनेक वेळा मोठी आर्थिक संधी समोर असतानाही रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेल्या नात्याला धक्का लागू नये म्हणून काही कामे त्यांनी सोडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. या सर्व गोष्टींची जाणीव रवींद्र चव्हाण यांनाही होती.

वास्तुशांतीचा कार्यक्रम आधी; त्यानंतर सोलापूर बैठकीचे नियोजन
या दौऱ्याचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर येथील भाजपची विभागीय बैठक ही वास्तुशांतीच्या कार्यक्रमानंतर ठरविण्यात आली होती. अक्की बर्वे यांच्या नव्या वास्तूच्या वास्तुशांतीसाठी रवींद्र चव्हाण यांचा वंजारवाडी दौरा अगोदरच निश्चित झाला होता. या भागात आपण येणारच आहोत, तर त्याच अनुषंगाने सोलापूर येथे पक्षाची विभागीय बैठकही घेण्यात यावी, असा विचार पुढे आला आणि त्यानंतर सोलापूरच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले.
त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा या भागातील दौरा केवळ पक्षाच्या बैठकीपुरता मर्यादित नव्हता. उलट अक्की बर्वे यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा दिलेला शब्द हा या दौऱ्यातील आधीचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. यामुळेच कार्यकर्त्याला दिलेला शब्द आणि त्याच्याशी असलेले नाते जपण्यासाठी नेतृत्व किती कटिबद्ध असू शकते, याचे हे उदाहरण ठरले.

‘तुम्ही याल तोच माझ्यासाठी शुभमुहूर्त’
अक्की बर्वे यांनी वंजारवाडी येथे आपल्या मेहनतीच्या जोरावर टुमदार अशी वास्तू उभारली आहे. या नव्या घराच्या वास्तुशांतीचा दिवस ठरवितानाही रवींद्र चव्हाण यांच्याविषयी असलेला आदर आणि जिव्हाळा दिसून आला.
“साहेब, तुम्ही माझ्या वास्तुशांतीला ज्या दिवशी याल, तोच दिवस माझ्यासाठी शुभमुहूर्त असेल. त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची मला गरज नाही,” अशी भावना अक्की बर्वे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार २० ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम त्याच दिवशी आयोजित करण्यात आला.
रवींद्र चव्हाण यांनीही दिलेला शब्द पाळत वंजारवाडी गाठली. नव्या वास्तूमध्ये जाऊन अक्की बर्वे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे अक्की बर्वे यांनी ज्या-ज्या ठिकाणी जाण्याची विनंती केली, त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी कोणताही मोठेपणा न दाखविता आवर्जून भेट दिली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची आणि सहकाऱ्यांप्रती असलेल्या आपुलकीची विशेष चर्चा रंगली.

भूममधील स्वागत ठरले चर्चेचा विषय
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वंजारवाडी येथे येणार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अक्की बर्वे यांचा मोठा मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होता. भूम परिसरात अक्की बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले रवींद्र चव्हाण यांचे स्वागतही लक्षवेधी ठरले.
मोठ्या पदावर असलेला नेता आपल्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरातील आनंदाच्या सोहळ्यासाठी वेळ काढतो, त्याच्यासोबत दिवसभर फिरतो आणि त्याच्या आग्रहाचा मान राखतो, हे चित्र आजच्या राजकारणात दुर्मिळ असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

सामान्य घरातून डिजिटल क्षेत्रात भरारी
अक्की बर्वे यांचा प्रवासदेखील प्रेरणादायी आहे. छोट्याशा वंजारवाडी गावातून कोणतीही मोठी राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर डिजिटल क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. आज त्यांच्याकडे ग्राफिक डिझाईन आणि सोशल मीडिया क्षेत्रात काम करणारी सक्षम टीम असून राज्यातील विविध नेत्यांचे डिजिटल काम ते सांभाळत आहेत.
मात्र या प्रवासात त्यांनी पैशापेक्षा नात्याला, विश्वासाला आणि नैतिकतेला महत्त्व दिले. म्हणूनच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याने त्यांच्या वास्तुशांतीसाठी खास वेळ राखून ठेवत वंजारवाडीपर्यंत येणे, ही अक्की बर्वे यांच्या मेहनतीला आणि निष्ठेला मिळालेली मोठी पोचपावती मानली जात आहे.
राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील नाते केवळ निवडणुकीपुरते नसते, तर ते सुख-दुःखात जपले गेले पाहिजे. अक्की बर्वे यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून रवींद्र चव्हाण यांनी हेच दाखवून दिले. त्यामुळे ‘कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता’ अशी त्यांची प्रतिमा या भेटीनंतर अधिक ठळकपणे समोर आली आहे.













Users Today : 65
Users Yesterday : 25
This Month : 540
Total Users : 38515