शिंदे गटातही अस्वस्थतेची चर्चा; खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर हालचालींना वेग; युवा नेते मल्हार पाटील यांची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण
कळंब (प्रतिनिधी) : कळंब शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शहरातील दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंबमधील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असतानाच शिवसेना शिंदे गटातही अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तसेच युवा नेते मल्हार पाटील, भाजपा नेते नितीन काळे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.नितीन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या नगरसेवकांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला. एकाच वेळी मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने कळंब शहरात भाजपची राजकीय ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर वाढल्या होत्या हालचाली
काही दिवसांपूर्वी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कळंबच्या राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या. वेगवेगळ्या पक्षांतील पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचा हा सामूहिक भाजप प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

एका बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याने ठाकरे गटासमोर संघटनात्मक आव्हान निर्माण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटातही काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात कळंबमध्ये आणखी काही पक्षांतरांची नोंद होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
युवक नेते मल्हार पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण
या संपूर्ण पक्षप्रवेशाच्या घडामोडीत भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी कळंब शहरातील विविध राजकीय गटांशी संपर्क वाढवत संघटनात्मक बांधणीवर भर दिला होता. त्याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून हा मोठा पक्षप्रवेश घडल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते मल्हार पाटील यांच्या सक्रिय भूमिकेमुळे कळंब शहरात भाजप आपली ताकद वाढवत असल्याचे या प्रवेशातून स्पष्ट होत आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक
- संजय मुंदडा
- सागर मुंडे
- इंदुबाई नंदू हौसलमल
- सफुरा शकील काझी
- जमील खुरेशी
- ज्योती हारकर
- रुक्सना बागवान
- वनमाला शंकर वाघमारे
- अर्चना मोरे
- आशा सुधीर भवर
या सामूहिक पक्षप्रवेशामुळे कळंब शहरातील राजकीय गणिते नव्याने मांडली जात असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.













Users Today : 3
Users Yesterday : 89
This Month : 633
Total Users : 38608