धाराशिव नगरपरिषदेसाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर केलेल्या तब्बल १८ कोटी रुपयांच्या विकासनिधीवरून राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय शीतयुद्ध पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
धाराशिव शहरातील आठवडी बाजार, राजमाता जिजाऊ उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या विकासासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आणि प्रसिद्धिपत्रकांमधून या निधीचे श्रेय आपल्या नेत्याला देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राजकीय वर्तुळात विशेष चर्चा यासाठी सुरू झाली आहे की, यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचा भाग होते, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील महायुतीतील प्रमुख चेहरा होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप सातत्याने पाहायला मिळत होते.
मात्र अलीकडेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मतदार आणि राजकीय निरीक्षकांना आता दोन्ही नेत्यांमधील संघर्ष कमी होईल आणि विकासाच्या मुद्यांवर एकत्रितपणे काम होईल, अशी अपेक्षा होती.
परंतु, ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी १८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा होताच श्रेयवादाचे राजकारण पुन्हा समोर आले. एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याचा दावा करत महायुतीच्या नेत्यांनी प्रसिद्धी मोहीम सुरू केली, तर दुसऱ्या बाजूला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.
यामुळे दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक शीतयुद्ध अद्याप संपले नसून ते नव्या राजकीय समीकरणांमध्येही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या श्रेयवादाला आणखी धार येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिक मात्र या राजकीय वादाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. “निधी कोणामुळे आला यापेक्षा मंजूर झालेली कामे वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
धाराशिवच्या विकासासाठी मंजूर झालेला १८ कोटी रुपयांचा निधी शहरासाठी निश्चितच महत्त्वाचा असला तरी, त्यावरून सुरू झालेला श्रेयवाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Users Today : 8
Users Yesterday : 38
This Month : 765
Total Users : 36051