विधानसभेत मदत घेतली, नगर परिषदेत वाऱ्यावर सोडलं?; निधी वळवणे, कार्यकर्त्यांना डावलणे आणि पक्षांतर्गत विरोधावरून ११ सवालांची सरबत्ती
कळंब (प्रतिनिधी) : कळंबच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या घडामोडींनंतर आता नाराजीची कारणेही उघडपणे समोर येऊ लागली आहेत. संजय मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “आम्ही केलेला निर्णय विश्वासघात म्हणत असाल, तर आमच्यासोबत यापूर्वी जे घडले त्याला काय म्हणायचे?” असा सवाल उपस्थित केला आहे.
नगर परिषद निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान, संघटनेत स्थान आणि राजकीय पाठबळ मिळाले का, याचा हिशेबच मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ प्रश्नांच्या माध्यमातून नेतृत्वासमोर मांडला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीत कळंबमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संपूर्ण ताकद वापरून घ्यायची; मात्र नगर परिषद निवडणुकीची वेळ आली की त्याच कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे, हे विश्वासघाताचे लक्षण नाही काय? असा पहिला आणि महत्त्वाचा सवाल त्यांनी केला आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या काळात कळंबमधील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अपेक्षित ताकदीने नेतृत्व उभे राहिले नाही, उलट धाराशिवमध्येच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले, असा आरोपही करण्यात आला आहे. “निवडणुकीत आपल्याच कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवणे हा विश्वासघात नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याहून गंभीर आरोप पक्षांतर्गत गटबाजीबाबत करण्यात आला आहे. स्वतःला पक्षनिष्ठ म्हणवून घेणाऱ्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात काम केले, असा दावा मुंदडा व सहकाऱ्यांनी केला आहे. अशा कार्यकर्त्यांविरोधात कोणतीही कठोर कारवाई न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कळंबचा निधी धाराशिवला वळविल्याचा आरोप
मुंदडा व सहकाऱ्यांनी निवडणूक निधीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नगर परिषद निवडणुकीच्या काळात कळंबसाठी आलेला निधी परस्पर धाराशिवकडे वळविण्यात आला. हा दावा करताना, “कळंबसाठी आलेला निधी दुसरीकडे वळविणे हा कार्यकर्त्यांशी आणि उमेदवाराशी विश्वासघात नाही का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेली आर्थिक देणी भागविण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर स्वतःचे प्लॉट विकण्याची वेळ आली, तरीही पक्षातील जबाबदार नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘विधानसभेला मतदान दिलं, पण संघटनेत स्थान नाही’
विधानसभा निवडणुकीत मर्यादित यंत्रणा असूनही पक्षाच्या उमेदवाराला कळंब शहरातून तुल्यबळ मतदान मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. मात्र निवडणूक झाल्यानंतर त्याच कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्या देताना डावलण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
“विधानसभा निवडणुकीत रात्रंदिवस राबणाऱ्या एकाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला संघटनेत महत्त्वाचे स्थान मिळाले नाही, हे विश्वासघाताचे रूप नाही काय?” असा प्रश्न मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
‘गोरगरीब कार्यकर्त्यांसाठी पक्षाने काय केले?’
शहरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कार्यकर्त्यांच्या भवितव्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. काम, रोजगार अथवा विकासकामांची छोटी-मोठी कंत्राटे देताना सामान्य कार्यकर्त्यांना संधी न देता ठरावीक लोकांनाच फायदा करून देण्यात आला, असा त्यांचा आरोप आहे.
त्यासोबतच लोकप्रतिनिधींचा विकास निधीदेखील काही मोजक्या, नेत्यांच्या पुढे-मागे फिरणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिला का, असा सवालही त्यांनी केला.
‘मोठ्या पक्षांतरांवर मौन, छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वासघाताचा शिक्का?’
संजय मुंदडा व सहकाऱ्यांनी सर्वाधिक बोचरा सवाल पक्षांतराच्या राजकारणावर केला आहे. मार्केट कमिटीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत झालेल्या मोठ्या राजकीय पक्षांतरांवेळी ‘विश्वासघात’ म्हणून बॅनरबाजी करण्यात आली नाही; मात्र छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली की त्यांच्या प्रतिष्ठेशी खेळले जाते, असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे, “विश्वासघाताची व्याख्या नेमकी सर्वांसाठी समान आहे की ती व्यक्ती आणि राजकीय सोयीनुसार बदलते?” असा अप्रत्यक्ष सवाल या भूमिकेतून उपस्थित होत आहे.
११ प्रश्नांतून साचलेल्या नाराजीला वाट
संजय मुंदडा आणि सहकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे केवळ तात्कालिक पक्षांतरापुरते मर्यादित नसून, नगर परिषद निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत साचत गेलेल्या नाराजीचे प्रतिबिंब असल्याचे दिसत आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रमुख सवाल असे —
- विधानसभा निवडणुकीत पूर्ण मदत घ्यायची आणि नगर परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे, हा विश्वासघात नाही का?
- नगर परिषद निवडणुकीत कळंबकडे पाठ फिरवून धाराशिवमध्येच थांबणे, हा विश्वासघात नाही का?
- पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी जातीय समीकरणे पाहून स्वतःच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणे, हा विश्वासघात नाही का?
- पक्षात राहून विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई न करणे, हा विश्वासघात नाही का?
- कळंबसाठी आलेला निवडणूक निधी परस्पर धाराशिवला वळविणे, हा विश्वासघात नाही का?
- निवडणुकीची देणी फेडण्यासाठी उमेदवाराला स्वतःची मालमत्ता विकावी लागली तरी दुर्लक्ष करणे, हा विश्वासघात नाही का?
- मर्यादित यंत्रणेत विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान मिळवून देणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे, हा विश्वासघात नाही का?
- विधानसभा निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत स्थान न देणे, हा विश्वासघात नाही का?
- शहरातील गोरगरीब कार्यकर्त्यांना काम, रोजगार किंवा कंत्राटी कामांमध्ये संधी न देणे, हा विश्वासघात नाही का?
- विकास निधी केवळ मोजक्या ‘शायनिंग’ करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच देणे, हा विश्वासघात नाही का?
- मोठ्या नेत्यांच्या पक्षांतरावर मौन बाळगायचे आणि छोट्या कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करायचे, हा विश्वासघात नाही का?
“आमच्यावर विश्वासघाताचा आरोप करणाऱ्यांनी आधी या ११ प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका संजय मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मांडण्यात आली आहे.
या आरोपांमुळे कळंबमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, आता या प्रश्नांवर संबंधित पक्षनेतृत्व काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या आरोपांबाबत संबंधित नेतृत्वाची बाजू समोर आल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.











Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514