धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील आणि उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची निवड झाल्यानंतर आता सभापतीपदावर कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या या निवडीबाबत राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत एकत्रितपणे मतदान केल्याने राज्यातील फॉर्म्युलाच धाराशिवमध्येही लागू राहिल्याचे दिसून आले. याबाबतचा अंदाज राजकीय कट्टा यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेत एकूण चार सभापतीपदे असून त्यापैकी दोन पदे भाजपकडे, तर एक-एक पद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता महत्त्वाचे समजले जाणारे अर्थ व बांधकाम खाते मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदारसंघाला सभापतीपदांमध्ये झुकते माप मिळण्याची चर्चा आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आल्यामुळे अमोल भोरे आणि भाऊसाहेब खरसडे यांच्यापैकी एकाला अर्थ व बांधकाम सभापतीपदाची संधी मिळू शकते. तर खाते बदल झाल्यास आणि महिला व बालकल्याण खाते राष्ट्रवादीकडे आल्यास शुभांगी देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेकडे कोणते खाते येते यावर त्यांच्या सभापतीपदाच्या निवडी अवलंबून असणार आहेत. जर शिवसेनेतील सावंत गट सत्तेत सहभागी होण्याचे ठरले तर यामध्ये विकी चव्हाण,वैशाली डोके,जयश्री काळे आणि सविता तळेकर यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. आणि जर सावंत गटांनी सभापती पदाला नकार दिला तर ईटकुर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अनंत लंगडे, पळसप जिल्हा परिषद गटाचे सदस्य अजित लाकाळ किंवा लोहारा तालुक्यातील निवडून आलेल्या श्रुती पनूरे किंवा सुवर्णाताई पाटील यांचीही सभापतीपदी वर्णी लागू शकते.
तर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापतीपदांपैकी एक उमरगा विधानसभा मतदारसंघाला, तर दुसरे कळंब तालुक्याला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परवाच धनंजय सावंत यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश पाहता त्यांचेही नाव सभापती पदाच्या चर्चेत असल्याची माहिती आहे.एकूणच, सभापतीपदाच्या वाटपावर अंतिम निर्णय कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळते यावर ठरणार असून, येत्या काही दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.












Users Today : 24
Users Yesterday : 20
This Month : 1128
Total Users : 33972