धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तब्बल चार वर्षे उलटल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. पंचायत समिती सभापती पदांच्या निवडी पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. महायुतीमध्ये वर्चस्वासाठी सुरू असलेली ‘रस्सीखेच’ आणि दिग्गज नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.
बलाबल आणि मॅजिक फिगर
५४ सदस्य संख्या असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २८ या जादुई आकड्याची गरज आहे. सध्याचे पक्षीय चित्र खालीलप्रमाणे आहे:
- भाजप: १९
- शिवसेना (शिंदे गट): १५
- शिवसेना (ठाकरे गट): ०७
- राष्ट्रवादी काँग्रेस -06
- काँग्रेस: ०३
- अपक्ष: ०४
- समाजवादी पक्ष: ०१
दोन दिग्गजांमधील ‘पॉवर गेम’
जिल्ह्याचे राजकारण सध्या आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार डॉ. तानाजी सावंत या दोन नेत्यांभोवती फिरत आहे. भाजपकडे १९ सदस्यांचे संख्याबळ असल्याने अर्चनाताई पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा गायकवाड यांच्या नावासाठी तानाजी सावंत गट आग्रही असल्याचे समजते.
सदस्यांची ‘वारी’ आणि नेत्यांची ‘फिल्डिंग’
अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जवळ येत असतानाच फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्य एकत्र तर शिवसेना पक्षाचे सदस्य त्यातही दोन गट आहेत एका गटात आठ आणि दुसऱ्या गटात सात असे सदस्य महिनाभरापासून ‘सहलीवर’ आहेत. दुसरीकडे, शिवसेनेचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीसाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. महिनाभरापासून घरापासून दूर असलेल्या काही सदस्यांमध्ये आता अस्वस्थता असून, “निवडी कधी होतील आणि आम्ही घरी कधी जाऊ?” अशी भावना व्यक्त होत आहे.
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची भूमिका ठरणार निर्णायक?
आ.राणा पाटील आणि आ.डॉ.तानाजी सावंत यांच्यातील वादाचा फायदा आपला गट कसा करून घेईल, याकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लक्ष लागले आहे. जर महायुतीतील दोन्ही गटांचे मतभेद विकोपाला गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने?
ऐनवेळी अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की शिवसेनेकडून एखादे नवीन नाव समोर येणार? किंवा धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण उदयास येणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्तेच्या या सारीपाटात कोण कोणाला मात देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.












Users Today : 20
Users Yesterday : 40
This Month : 1169
Total Users : 30854