प्रा.सतिश मातने
राजकारण करायचं असेल तर आता केवळ रस्ते, पाणी, नळ, गटार पुरेसं नाही, तर लोकांच्या लग्नाच्या गाठीही जुळवाव्या लागतील!
पूर्वी नेता व्हायचं म्हणजे समाजात छोटी-मोठी कामं करत करत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा टप्प्यांतून प्रगती करावी लागायची. मात्र आज काळ बदलतोय, आणि कामांची स्वरूपंही!
कधी काळी गावातील मोठे नेते अनेक लग्न जुळवायचे. ही गोष्ट केवळ सामाजिक नव्हती, तर ती माणसं जोडण्याची एक सुंदर पद्धत होती. पण ही परंपरा हळूहळू मागे पडली… आणि आता तर पारच हरवून गेलीय.
आज विवाह संस्थांच्या माध्यमातून लग्न जुळवली जातात, पण त्यासाठी हजारोंची नोंदणी फी भरावी लागते. तरीही मुलं-मुलींचं जुळणं अवघडच आहे.
मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत — सरकारी नोकरी, पुणे-मुंबईत स्वतःचं घर, एकटं राहणारा नवरा…
तर दुसरीकडे, गावांमध्ये चांगले, कष्टाळू, निर्व्यसनी मुलं असूनही त्यांचं लग्न जमत नाही!
हे फक्त एका व्यक्तीचं दु:ख नाही, ही समाजाची गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण्यांनीही आता सक्रिय भूमिका घेतली पाहिजे.
माझं वैयक्तिक मत –
जो ग्रामपंचायत लढवणार असेल, त्याने 5 लग्नं जमवावीत.
जो सरपंच होऊ इच्छितो, त्याने 15 जोड्या जोडाव्यात.
पंचायत समितीसाठी 50, जिल्हा परिषदसाठी 100 आणि
विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराने किमान 500 लग्न जुळवावीत!
ही केवळ शिफारस नाही, ही आजच्या समाजाच्या गरजांची जाणीव आहे.
राजकारण म्हणजे जनसेवा आणि आज जनतेला सर्वात जास्त गरज आहे – लग्न जमवण्याच्या मदतीची!
परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांनी भर सभेत जाहीर केलं होतं – “मी निवडून आलो, तर एकही मुलगा अविवाहित राहणार नाही!”
हे वक्तव्य ऐकताना लोकांनी हसलं असेल, पण खरं तर त्यांनी समाजाच्या नस पकडली होती!
जर राजकारणी लोकांनी या विषयात लक्ष घातलं, तर एक नवा सामाजिक बदल घडवून आणता येईल.
अन्यथा, ही अविवाहित तरुण पिढी उद्याचे सर्वात मोठे राजकीय आव्हान ठरू शकते!












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249