माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिवच्या भुम शहरात केंद्र सरकारच्या अमृत 2.0 (AMRUT 2.0) योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी आज हजारो महिला आणि नागरीकांनी रस्त्यावर उतरून पाणी बचाव कृती समितीच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता ताई गाढवे यांनी केले.

केंद्र सरकारने भुम शहरासाठी 42 कोटी 50 लाख रुपयांची अमृत दोन योजना मंजूर केली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला २४ तास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ही योजना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली.
मात्र, या योजनेविरोधात काही घटकांनी विरोध दर्शवत, पाणी मीटर बसवले जाणार असल्यामुळे नागरीकांवर आर्थिक बोजा पडेल असा दावा करत योजना थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर “योजना रद्द न करता लवकरात लवकर अंमलात आणा”, या मागणीसाठी पाणी बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिलं.
या मोर्चादरम्यान महिलांनी जलसंधारण, पाण्याच्या हक्कासाठी आवाज उठवत घोषणाबाजी केली. योजनेबाबतची स्पष्टता, पारदर्शकता आणि जलवितरण व्यवस्था सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.