“चोराच्या उलट्या बोंबा, राणा पाटील यांचा रडका प्रकार सुरूच”-शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर टोला
धाराशिव, दि. २९ ऑक्टोबर:
धाराशिव शहरातील १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारने स्थगिती दिली, तरीही याचा दोष विरोधकांवर ढकलला जात आहे — हे “चोराच्या उलट्या बोंबा” सारखे असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला आहे.
भाजप आणि राणाजगजित सिंह पाटील यांच्यावर निशाणा
जाधवर म्हणाले,
“निधी मंजूर झाला की श्रेय स्वतः घ्यायचे, पण मनासारखे झाले नाही की दोष आमच्यावर ढकलायचा — हा रडका प्रकार आता जिल्ह्यात सुरू आहे. राणा पाटील हे सातत्याने याच पद्धतीने राजकारण करत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, विरोधात असलेल्या आमदार-खासदारांशी सत्ताधारी मंडळी कशी वागतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. रस्त्यांच्या निधीबाबत तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच “श्रेयवाद” सुरू होता.
२० महिन्यांनंतरही कामे ठप्प
“फेब्रुवारी २०२४ पासून निविदा प्रक्रियेस तब्बल २० महिने लागले. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे त्यांच्याच मित्रपक्षाकडून बोलले जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देऊन गर्व माजवणारे आता स्वतःच्या सरकारने रस्त्यांच्या कामांना स्थगिती दिल्यावर मात्र विरोधकांवर दोष टाकत आहेत — हे हास्यास्पद आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“दुकान तुमचं, दुकानदारी तुमची आणि तोटा झाला आमच्यामुळे — हे कुणालाही पटेल का?” असा प्रश्न जाधवर यांनी उपस्थित केला.
“स्थगिती देणारे तुम्हीच”
जाधवर पुढे म्हणाले,
“जुलै २०२२ ला महाविकास आघाडीचे सरकार पडून महायुतीचे सरकार आले. त्याच सत्ताधाऱ्यांनी मागील आघाडी सरकारच्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ती स्थगिती उठवली नाही. मग जर आमच्या मताला एवढं महत्त्व असतं, तर कामे रद्द झाली नसती.”
त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या सरकारने रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार अशीच जुनी कामे पुन्हा मंजूर केली, पण अजूनही एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.
“गुत्तेदार अपात्र असूनही प्रयत्न — हीच खरी प्रवृत्ती”
जाधवर म्हणाले,
“ज्यांना दुसऱ्यांची प्रवृत्ती सांगायची आहे, त्यांनी स्वतःकडे बघावे. एक गुत्तेदार अपात्र असूनही त्याला पुन्हा पात्र करण्यासाठी वीस महिने धडपड केली — हीच त्यांची खरी प्रवृत्ती आहे. काळ याचे उत्तर देईल.”
त्यांनी भाजप आमदारांवर टीका करताना म्हटले की, “माझ्याच मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर काहीच होऊ द्यायचं नाही” या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे.
“रस्त्यांची कामे व्हावीत, हीच आमची भूमिका”
“आम्ही एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यात दोष कोणाचा आहे, हे स्पष्ट होईल. पण शहरवासीयांचे वीस महिन्यांपासून चाललेले हाल थांबावेत आणि रस्त्यांची कामे लवकर सुरू व्हावीत, हीच आमची प्रामाणिक भावना आहे,” असे जाधवर यांनी सांगितले.












Users Today : 23
Users Yesterday : 81
This Month : 1680
Total Users : 27108