कोर्टाच्या दिलाश्यानंतर लवकरच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक
फैयाज शेख आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून थोडेसे दूर असलेले जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या पिचवर खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवतील, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या वहिनी छाया कांबळे यांनी सुकटा जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्या जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील छाया कांबळे यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्या वेळी नेताजी पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते.
२०१९ ची विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरेश कांबळे यांनी लढवली होती आणि त्या निवडणुकीत त्यांनी सुमारे २८०००पेक्षा जास्त मते मिळवली होती.त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला गट कायम ठेवला होता.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना एका गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर गावोगाव त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.त्यानंतर फैयाज शेख आत्महत्या प्रकरण घडले. या प्रकरणात नाव आल्याने कांबळेंना काही काळ अडचणींना सामोरे जावे लागले. आता मात्र त्या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाव वगळल्याने सुरेश कांबळे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
भूम तालुक्यातील पाचपैकी तीन जिल्हा परिषद गट हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये सुकटा व वालवड हे गट महिलांसाठी आरक्षित, तर पाथरूड गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे कांबळे यांच्या दृष्टीने हे तीनही मतदारसंघ लढवण्यासाठी अनुकूल आहेत.
यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली सुकटा गटातून मोठ्या मतांनी विजय मिळवला असल्याने, जर घरातील महिला उमेदवार द्यायची ठरवली तर त्या गटात उमेदवारी शक्य आहे. मात्र कांबळे यांचे गाव वालवड जिल्हा परिषद गटात येत असल्याने, तडजोडीच्या राजकारणात तेथूनही लढवले जाऊ शकतात. स्वतः लढवण्याचा निर्णय घेतल्यास, पाथरूड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
यामुळे सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा आणि हालचाल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.














Users Today : 11
Users Yesterday : 77
This Month : 1587
Total Users : 27015