इटकुर गावानं बुधवारी एक अनोखा सोहळा अनुभवला — नाव पतसंस्थेच्या शाखा उद्घाटनाचं, पण रंग मात्र राजकारणाचा चढलेला!
‘स्वप्नपूर्ती नागरी सहकारी महिला पतसंस्था’ शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले, आणि व्यासपीठावर बसलेल्यांची नावेच एवढी “दैवी” होती की उपस्थितांनी या कार्यक्रमाला “देवांची परिषद” असंच नाव दिलं.
ओम, कैलास,पांडुरंग,श्रीधर विठ्ठल आणि महादेव — देवांची राजकीय संगमसभा
व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष (SP) श्रीधर भवर पतसंस्थेचे संस्थापक विठ्ठल माने, आणि सूत्रसंचालक महादेव खराटे — अशी दैवी नावांची चौकडी जमली होती.
लोकांमध्ये कुजबुज होती — “हा कार्यक्रम पतसंस्थेचा की जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा शुभारंभ?”
शिक्षक विठ्ठलाची ‘स्वप्नपूर्ती’ आणि राजकीय संकेत

शिक्षक असलेले विठ्ठल माने यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘स्वप्नपूर्ती पतसंस्था’ स्थापन केली.
मात्र आता त्यांचे स्वप्न अधिक मोठे आहे-इटकुर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी.
या उद्घाटनानेच त्यांच्या राजकीय वाटचालीचा नारळ फुटल्याची चर्चा गावभर सुरू आहे.
खा. ओमराजेंचा सिग्नल आणि प्रवीण स्वामींचा दाखला
खा. ओमराजे निंबाळकर यांनी भाषणात सूचक राजकीय संदेश दिला:

“राजकारणात चांगली माणसं यायला हवीत. शिक्षक समाजाचं कणा आहेत. आमदार प्रवीण स्वामी हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत — त्यांनी २८ दिवसांत शिक्षक ते आमदार असा प्रवास केला.”
हे वाक्य संपताच उपस्थितांची नजर विठ्ठल माने यांच्याकडे वळली.
त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हलके स्मित म्हणजे जणू — “हो, आता माझी वेळ आलीय” असाच संदेश होता.
बाळकृष्ण तांबारे-शिक्षक ते आमदार प्रवासातील पूल
व्यासपीठावर उपस्थित बाळकृष्ण तांबारे सर हे आमदार प्रवीण स्वामी यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा दुवा असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. त्याचवेळी हजरजवाबी बाळकृष्ण तांबारे सर यांनी आता एक जिल्हा परिषदेत पाठवा असं म्हणत विठ्ठल माने यांना अनुमोदन दिले. यावेळी खासदारांनी चांगली माणसं राजकारणात यावी ही माझी मनोमन इच्छा असल्याचे सांगत तांबारे सर यांनी आ.स्वामी यांना राजकारणात उतरवण्याची प्रेरणा दिली होती.
आता त्या मंचावर विठ्ठल माने त्यांच्याच बाजूला बसलेले पाहून लोक म्हणत होते-
“तांबारे सरांचा आशीर्वाद आता विठ्ठल माने यांना ही मिळेल का?”
आ. कैलास पाटील आणि संजय दुधगावकर यांची पाठराखण

आ. कैलास पाटील यांनी भाषणात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितलं-
“शिक्षक हे समाजातील नेतृत्व निर्माण करणारे घटक आहेत. विठ्ठल माने यांचं काम प्रेरणादायी आहे.”
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला राजकीय वजनही मिळालं.
विठ्ठल–महादेव जोडी : निष्ठेचा संगम
विठ्ठल माने आणि महादेव खराटे — ही जोडी म्हणजे शिक्षकी भावनेतून समाजसेवेचं मूर्तिमंत उदाहरण.
महादेव खराटे यांनी सूत्रसंचालनात प्रत्येक संधीवर विठ्ठलांच्या उमेदवारीसाठी सूचक शब्द वापरत “भक्तीभावाने राजकारणाची घंटा” वाजवली.

देवांची यादी अजून वाढली-पांडुरंग आणि श्रीधर यांचंही आगमन
या “दैवी परिषदेत” दोन नावांनी अजून गोडी आणली-
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर.
दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते; त्यांनी भाषण केलं नाही, पण त्यांच्या उपस्थितीने “देवांची नावं” यादी पूर्ण झाली.
लोकांमध्ये विनोदाने चर्चा रंगली -“पांडुरंग आणि श्रीधर आल्यानंतर तर ही खरी देवसभा झाली!”
पत्रकारांचाही ‘दैवी योग’
या कार्यक्रमात पत्रकारांच्याही नावांमध्ये दैवी नाद होता –
बालाजी आडसूळ (लोकमत), परमेश्वर पालकर (पुढारी) आणि बालाजी देसाई (जनमत)-
हे तिघेही समोरच्या रांगेत बसून प्रत्येक हालचाल टिपत होते.
त्यांच्या नजरा सतत मंचावर, आणि प्रश्न एकच-
“हा कार्यक्रम पतसंस्थेचा की जिल्हा परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ?”
पतसंस्था उद्घाटन की प्रचार सभा
कार्यक्रम संपल्यानंतर इटकुरात एकच चर्चा-
देवांची नावं, शिक्षकांचा संगम, आणि राजकीय संकेत-
सगळं काही एका मंचावर घडलेलं!
आता गावात प्रश्न गुंजतो
“विठ्ठलाला कैलासचा आशीर्वाद, ओमचा आदेश, तांबारे सरांचा संकेत, पांडुरंगाचं दर्शन आणि श्रीधरचं समर्थन आणि महादेवाची खंबीर साथ हे सगळं मिळालं तर जिल्हा परिषदेचा दरवाजा उघडायलाच हवा ना?”













Users Today : 23
Users Yesterday : 55
This Month : 1522
Total Users : 26950