सह संपर्कप्रमुख भगवान देवकते यांनी दिली माहिती
धाराशिव, दि. 18 जुलै – धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक 18 व 19 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर तुळजापूर ते उमरगा मार्गावरील गावांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
दौऱ्याची सुरुवात 18 जुलै रोजी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने त्यांच्या अधिकृत दौऱ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर ते उमरगा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन स्थानिक जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात पालकमंत्री विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, उमरगा येथील नवीन बस स्थानकाचे भूमिपूजन देखील त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे सह-संपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्तरावरील समर्थक झटत आहेत. दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भगवान देवकते यांनी सांगितले की, “पालकमंत्री सरनाईक यांचा दौरा केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित नसून, तो तालुक्याच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीत होणारे संवाद व भूमिपूजन हा तालुक्याच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
हा दौरा राजकीयदृष्ट्या तसेच विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा असून, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात उमरगा तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.