मुंबई | दि. १० एप्रिल –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) अध्यक्षपदी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे एकाच व्यक्तीकडे अध्यक्षपद आणि मंत्रालयाची जबाबदारी एकवटल्याने, महामंडळाला धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटी महामंडळाची स्थापना सन १९६० मध्ये झाली होती. श्री. गो. सरैय्या हे या महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. प्रताप सरनाईक हे या पदाचे २६ वे अध्यक्ष आहेत.
मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात अडकले असून, कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन दरवाढ, अपुरा निधी, गाड्यांची दुरवस्था अशा विविध समस्यांनी महामंडळाची चाके थांबवली होती. परंतु सरनाईक यांची ही दुहेरी जबाबदारी या प्रश्नांवर अधिक वेगाने आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यास मदत करू शकते.
यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले:
“एसटी ही महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची ‘लोकवाहिनी’ आहे. या महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून एक दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
तसेच या पदावर नियुक्त करून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, एकाच व्यक्तीकडे परिवहन खाते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षपद असल्यामुळे निर्णय प्रक्रियेतील दिरंगाई टळेल. त्यामुळे एसटीच्या गाड्यांना नवसंजीवनी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.













Users Today : 11
Users Yesterday : 81
This Month : 1668
Total Users : 27096