धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यात अनेक कुटुंबांचा राजकारणात बोलबाला यापूर्वीच आहे. आज पवार कुटुंब जरी वेगळे असले तरी देखील दोन राज्यसभा सदस्य, एक लोकसभा सदस्य व दोन विधानसभा सदस्य आहेत. ठाकरे परिवारात एक विधान परिषद सदस्य तर एक विधानसभा सदस्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विधानसभा सदस्य तर त्यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे लोकसभा सदस्य आहेत तर खडसे परिवारात देखील सुन लोकसभा सदस्य तर एक विधान परिषद सदस्य आहे व मुलगी देखील विधानसभेची तयारी करत आहे.अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरणं सांगता येतील.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना देखील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.लोकसभा निवडणुकीत देखील धनंजय सावंत हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून देण्यात आली.त्यामुळे सावंत कुटुंबीयांवर पक्ष श्रेष्ठींना कानडोळा केला अशी देखील चर्चा आहे.यामध्ये स्वतःआरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत हे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात ते पुन्हा त्याच मतदारसंघातून उभारणार अशी शक्यता दिसत असली तरी देखील ऐनवेळी कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून डॉ.तानाजी सावंत तर भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून धनंजय सावंत हे निवडणूक लढू शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे.सावंत कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून तयारी करताना दिसून येत आहेत. साखर कारखानदारी व शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात त्यांची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत.जिथे साखर कारखानदारी तिथे आपसुकच राजकारण करणे सोपे जाते. त्याच अनुषंगाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून स्वतः डॉ.तानाजी सावंत किंवा धनंजय सावंत कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून धनंजय सावंत किंवा डॉ.तानाजी सावंत, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून गिरीराज सावंत तर माढा मतदारसंघातून शिवाजीराव सावंत असे पाच चुलते पुतणे हे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करताना दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत हे तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याच्या देखील बातम्या वारंवार येत आहेत. त्यामुळे सावंत परिवार येणारी विधानसभा निवडणूक ही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढवणार असल्याचे बोलले जाते.
डॉ.तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे माढा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा पराभूत झालेले होते मात्र डॉ.तानाजी सावंत यांच्या राजकीय एन्ट्री नंतर सर्व राजकीय गणिते बदलत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे नाव तयार केले आहे. डॅशिंग राजकारणी म्हणून त्यांची सध्या इमेज आहे. ते अनेक वेळा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात तर वरिष्ठ नेत्यांना देखील अंगावर घेण्याची हिम्मत ते दाखवतात. त्यामुळे ते कधी काय निर्णय घेतील हे देखील सांगता येत नाही अशी त्यांनी त्यांची राजकीय इमेज तयार झाली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर तीन-चार विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या परिवारातील सदस्य हे वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले तरी देखील आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कमी कालावधीत राजकारणात स्वतःचा नावलौकिक तयार करणे सोपी गोष्ट नाही मात्र ही गोष्ट डॉ.तानाजी सावंत यांनी अत्यंत कमी कालावधीत करून दाखवली. विशेष म्हणजे पवार कुटुंबियांना अंगावर घेण्याची हिम्मत अनेक राजकारण्यात नसते मात्र डॉ. तानाजी सावंत हे त्या बाबतीत माहीर मानले जातात.त्यामुळे येणारी विधानसभा ही सावंत परिवार कोण- कोणत्या मतदारसंघातून लढवणार याचे औत्सुक्य सर्वच राजकीय निरीक्षकांना व अभ्यासकांना आहे.













Users Today : 26
Users Yesterday : 77
This Month : 1602
Total Users : 27030