14 वर्षांनंतर प्रथमच विद्यार्थ्यांपेक्षा अधिक फॉर्म; शिक्षक भरती आणि ‘लाडका भाऊ’ योजनेचा सकारात्मक परिणाम
गेल्या १४ वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या अध्यापक विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज आले आहेत. शासनाच्या सलग तीन वर्षांच्या शिक्षक भरती मोहिमा आणि ‘मुख्यमंत्री लाडका भाऊ’ योजनेमुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या संधींचा थेट परिणाम अध्यापक विद्यालयाच्या लोकप्रियतेवर झाला आहे.
दरवर्षी अर्ज कमी पडणाऱ्या या शाखेत यंदा मुदतवाढ दिलेल्या पहिल्याच दिवशीच भरघोस प्रतिसाद मिळाला. 2024-25 साली राज्यात 571 पैकी 458 अध्यापक विद्यालये कार्यरत आहेत. यात जवळपास 22,900 विद्यार्थी शिकत आहेत, तर अनुदानित संस्था मिळून एकूण 27,000 प्रवेश क्षमतेची व्यवस्था आहे. यावर्षी 28,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, जे 2011 नंतर प्रथमच इतका मोठा आकडा गाठला आहे.
हे पाहता, अध्यापक विद्यालयांचा 14 वर्षांचा ‘वनवास’ संपून पुन्हा एकदा भरभराटीचा काळ सुरू झाला आहे, असेच म्हणावे लागेल. प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्था चालक यांचे चेहरे पुन्हा एकदा उत्साहाने उजळले असून शिक्षणक्षेत्रासाठी हा एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.
अध्यापक विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया 17 जून पर्यंत फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ मिळाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी विक्रमी असे जवळपास 4000 विद्यार्थ्यांनी आज फॉर्म भरले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्याचा दिसून येत असून येणाऱ्या 17 जूनपर्यंत हा आकडा 40 हजाराच्या आसपास जाईल अशी शक्यता आहे.