अंधारातून उजेडाकडे प्रवास-कन्हेरवाडीच्या तेजस्विनी जगतापची यशोगाथा.
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडीची मुलगी तेजस्विनी जगताप हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र कृषी आयुक्तालयातील लघुलेखक (निम्न श्रेणी), वर्ग-2 या पदावर आपले नाव कोरले आहे. तिच्या घरची परिस्थिती पाहिली तर हे यश अधिकच थक्क करणारे वाटते.
तेजस्विनीचे वडील बिभीषण वमन-जगताप पंचायत समिती कार्यालय, कळंब येथे परिचर म्हणून कार्यरत असून, दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. आई गृहिणी, घरात केवळ सात एकर बेभरवशाची शेती, आणि एकूण पाच जणांचा कुटुंब – या सर्व अडचणींमध्ये मोठी मुलगी असल्याने घरातील जबाबदाऱ्यांचे ओझे तिच्या खांद्यावर होते. तरीही वडिलांनी एक ठाम निर्धार केला होता – “मुलगी यशस्वी झाल्याशिवाय तिला हळद लावणार नाही, अगोदर तिला गुलाल लागेल आणि मगच तिला हळद लागेल अशी भीष्मप्रतिज्ञा तिचे वडील बिभीषण जगताप यांनी केली होती ती प्रतिज्ञा देखील तिच्या या यशामुळे पूर्ण झाली.
शिक्षण आणि संघर्षाचा प्रवास
प्राथमिक शिक्षण: जिल्हा परिषद शाळा, कन्हेरवाडी (पहिली ते सातवी).
माध्यमिक शिक्षण: सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कळंब.
उच्च माध्यमिक: त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, लातूर.
पदवी: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.
अतिरिक्त कौशल्य: टंकलेखन व स्टेनो परीक्षांमध्ये उत्तीर्णता (स्टेनो-६० लातूर, तर ८० व १०० कळंब).
स्पर्धा परीक्षांचा प्रवास सोपा नव्हता. एमपीएससी राज्यसेवेच्या दोन, तर कॉम्बाईनच्या चार परीक्षा अपयशानंतरही ती खचली नाही. अखेर 2023 च्या परीक्षेत तिने कृषी आयुक्तालयातील लघुलेखक निम्न श्रेणी वर्ग-2 पद पटकावले.

कुटुंबातील प्रेरणा व भविष्याचा संकल्प
तेजस्विनीच्या कुटुंबातील दुसरा भाऊ रोहन जगताप सध्या हैदराबाद येथील एम्समध्ये एमबीबीएस पूर्ण करत आहे. तर दुसरा भाऊ धाराशिव येथे फिजिओथेरपी करत आहे. हे संपूर्ण कुटुंब तिच्या यशाचा अभिमान बाळगते. वडील बिभीषण जगताप म्हणतात,
“हा दिवस आमच्या आयुष्याचा खरा सण आहे. आमची मुलगीच आमचा अभिमान आहे.”
तेजस्विनी स्वतः म्हणते,
“मी शेतकरी कुटुंबातील असल्याने भविष्यात शेतकरी धोरण ठरवताना किंवा शासकीय योजना राबवताना त्या योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्नशील राहीन.”
ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी संदेश
कोणतेही महागडे क्लास न लावता तिने हे यश मिळवले.
सातत्यपूर्ण परिश्रम, इच्छाशक्ती, आणि कुटुंबाचे पाठबळ हेच तिच्या यशामागचे गुपित.
तिच्या यशोगाथेने ग्रामीण भागातील इतर मुलींना प्रोत्साहन मिळत आहे.

ही कहाणी दाखवून देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती, मेहनत, आणि चिकाटीने कोणतीही शिखरे गाठता येतात. तेजस्विनी जगतापचे यश हे ग्रामीण भागातील सर्वांसाठी, विशेषत: मुलींसाठी, एक दीपस्तंभ ठरले आहे.













Users Today : 45
Users Yesterday : 68
This Month : 1770
Total Users : 27198