धाराशिव, दि. २८ मे २०२५ – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून शेतपिके, फळबागा, भाजीपाला आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची घरेही बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी राज्य सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
डॉ. पाटील यांनी यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली असून, जिल्ह्यातील सर्व तहसील आणि गावांमध्ये तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, कृषी मंत्री मा. अॅड. माणिकराव कोकाटे यांनाही स्वतंत्र पत्र लिहून कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, आणि जिल्हा प्रशासनाला तातडीचे आदेश देऊन पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
“शेतकरी हाच देशाचा खरा कणा आहे. अशा संकटाच्या काळात त्याला सरकारकडून त्वरित आधार मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे,” असे प्रतिपादन करत डॉ. पाटील यांनी सरकारने संवेदनशीलता दाखवून त्वरित हालचाली कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.












Users Today : 68
Users Yesterday : 81
This Month : 1725
Total Users : 27153