गेल्या १७ वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत अधिकारी पदोन्नतीमुळे मूळ आस्थापनेवर रुजू
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत गेल्या १७ वर्षांपासून स्वीय सहाय्यक व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश राऊत यांनी आता आपल्या मूळ शासकीय सेवेकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच सतीश राऊत यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली असून, त्या अनुषंगाने शासकीय नियमांनुसार त्यांना शरद पवार यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून असलेले पद सोडावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे कोणतेही राजकीय कारण नसून, ही एक शासकीय प्रक्रिया असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सतीश राऊत यांनी दीड दशकाहून अधिक काळ पवार साहेबांसोबत काम करताना राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा अमूल्य अनुभव घेतला. त्यांच्या सौम्य स्वभाव, तत्पर कार्यशैली आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले होते. पवार साहेबांचे ते विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पदोन्नतीमुळे आता ते अधिक जबाबदारीच्या भूमिकेत कार्यरत होणार आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासकीय सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकीय वर्तुळात सतीश राऊत यांच्या या बदलाची चर्चा रंगली असली, तरी ही घटना पूर्णतः शासकीय नियमांनुसार घडलेली आहे आणि त्यात त्यांची कोणतीही चूक नाही, हे स्पष्ट झाले आहे.












Users Today : 33
Users Yesterday : 55
This Month : 1532
Total Users : 26960