सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश; जुलैपासून थेट खात्यात जमा
राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच व उपसरपंचांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून जुलै २०२४ पासून सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पटीने वाढवण्यात आले असून ते थेट खात्यात जमा होऊ लागले आहे, अशी माहिती सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिली.
२०१७ मधील शासन निर्णयानुसार दिले जाणारे मानधन अद्यापही सुरू होते. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार मानधन वाढवण्याची गरज असल्याने सरपंच परिषद, पुणे कडून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे २०२४ च्या नवीन शासन निर्णयानुसार दुप्पट मानधन व सदस्य भत्त्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री गोरे यांनी तातडीने अंमलबजावणी सुरू केली.
उदगीर येथे पार पडलेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला मान्यता दिली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाला अंतिम मंजुरी देण्यात आली आणि शासन निर्णय जारी करण्यात आला.
या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाल्यामुळे राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावपातळीवरील लोकप्रतिनिधींना न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे, असे सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष माऊली वायाळ यांनी सांगितले.
ना. जयकुमार गोरे यांचा होणार जाहीर सत्कार

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सरपंच परिषदेकडून नाम. जयकुमार गोरे यांचा सातार्यात भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले व महिला प्रदेशाध्यक्षा झीनत सय्यद यांनी दिली.