वाढदिवस व्यक्तीविशेष
आज, धाराशिव आणि ठाणे येथील राजकीय क्षेत्रात आपल्या मेहनती आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या निष्ठेमुळे ओळखले जाणारे नितीन लांडगे यांचा वाढदिवस आहे.राजकारणात यशस्वी होण्यासाठी केवळ कौशल्य आणि मेहनतच पुरेशी नसते, तर योग्य मार्गदर्शन आणि नेतृत्वाची साथही महत्त्वाची ठरते. या बाबतीत नितीन लांडगे हे खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत, कारण त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची जवळीक आणि मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या राजकीय प्रवासाचा आणि त्यांच्या योगदानाचा हा आढावा.

मूळ ठाणे, पण धाराशिवशी नाते
नितीन लांडगे यांचा जन्म ठाण्यात झाला असला, तरी त्यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खोंदला आहे. बालपणी गावाशी फारसा संपर्क नसला, तरी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या मातृभूमीशी घट्ट नाते जोडले. ठाणे येथे युवा सेनेचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. याच वेळी, धाराशिव जिल्ह्यातील युवा सेनेच्या विस्तारक पदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली.सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
संघर्ष आणि संयमाचा प्रवास

राजकारणात अनेकदा संधी मिळवण्यासाठी संयम आणि सातत्याची गरज असते. नितीन लांडगे यांनी 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली होती. मात्र, दोन्ही वेळी त्यांना संधी मिळाली नाही. तरीही, त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. स्थानिक नेतृत्वाकडून काहीवेळा सहकार्याचा अभाव असतानाही, त्यांनी प्रत्येक नेत्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आदर आहे.
दिग्गज नेत्यांची जवळीक:एक वरदान

नितीन लांडगे यांचे राजकीय यशाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे दिग्गज नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व त्यांच्या पाठीशी आहे, तर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष मर्जीतील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत. ठाण्यातील बालपण आणि शिवसेनेच्या नेत्यांशी सतत संपर्क यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या जवळीकीचा अद्याप त्यांना मोठ्या राजकीय यशाच्या रूपात फायदा झालेला नाही. तरीही, “भगवान के पास देर है, अंधेर नहीं” या म्हणीप्रमाणे, त्यांना भविष्यात याचा नक्कीच लाभ होईल, अशी आशा आहे.
धाराशिवसाठी समर्पण

नितीन लांडगे यांनी ठाणे येथील राजकीय सक्रियतेसोबतच धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी अविरत प्रयत्न केले. सध्या ते कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख, धाराशिव जिल्हा शिवसेनेचे निरीक्षक आणि युवा सेनेचे राज्य विस्तारक म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या अंतर्गत कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी शासकीय पातळीवर मोठ्या जबाबदारीची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाही. तरीही, त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांचे स्थान मजबूत आहे.
भविष्याची वाटचाल आणि सुवर्णसंधी

प्रताप सरनाईक यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या जवळीकीमुळे नितीन लांडगे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सध्या त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याची आणि धाराशिवच्या विकासकामांना गती देण्याची मोठी संधी आहे. सत्ता ही कायम नसते, पण सत्तेच्या काळात कार्यकर्त्यांची फळी तयार करणे आणि त्यांना हाताला काम मिळवून देणे महत्त्वाचे आहे. नितीन लांडगे यांनी यावर लक्ष केंद्रित केले, तर भविष्यात त्यांचे नाव राजकारणात ठळकपणे झळकेल. कार्यकर्त्यांवर प्रेम करतानाच त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नितीन लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय कट्टा सोशल मीडिया वृत्तवाहिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांनी धाराशिवच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेले प्रयत्न पुढेही अखंड सुरू राहोत. त्यांच्या राजकीय प्रवासाला यश मिळावे आणि त्यांना भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळावी, अशी सदिच्छा! त्यांच्या हातून धाराशिवच्या प्रगतीला हातभार लागो आणि त्यांचे नेतृत्व नव्या पिढीला प्रेरणा देऊन जावो, ही अपेक्षा!














Users Today : 43
Users Yesterday : 77
This Month : 1619
Total Users : 27047