जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांचे आक्रमक धरणे आंदोलन; महिलांचा आणि जवान कुटुंबियांचाही सहभाग
धाराशिव –
पार्वती मल्टीस्टेट बँकेत आपली मुद्दल व व्याजाची रक्कम अडकलेले सुमारे ३५० ते ४०० ठेवीदार आता प्रचंड आक्रमक झाले असून, अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीसह धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेवीदारांनी आपली व्यथा मांडताना भावनिक आणि तीव्र आक्रोश केला.

जगताप यांनी आपल्या भाषणात थेट इशारा दिला की, २४ ऑगस्टपर्यंत बँकेने ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यास २५ ऑगस्ट रोजी आष्टा-मोड (ता. लोहारा) येथील राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल. यावेळी उपस्थित ठेवीदारांनी टाळ्यांचा कडकडाट करत या निर्णयास संमती दर्शवली.
न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई एकत्र
पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या गैरव्यवहारामुळे अडकलेल्या सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक रकमेवर ठेवीदारांचे हक्क असून, गेल्या आठवड्यात ईडी, गृह, सहकार आणि अर्थ खात्याकडे चार स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दोन याचिका दाखल होणार असल्याची माहिती अनिल जगताप यांनी दिली.
महिलांचा, अपंगांचा आणि जवानांच्या कुटुंबीयांचाही सहभाग

आज झालेल्या आंदोलनात विधवा महिला, अपंग व्यक्ती आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. “पोटाला पीळ मारून रुपया-रुपया साठवलेल्या रकमा आज बँकेत अडकून पडल्या आहेत, त्यामुळे जगणे कठीण झाले आहे,” असा साक्षात आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐकावयास मिळाला.
जिल्हाधिकारी यांच्याकडून सकारात्मक आश्वासन
धरणे आंदोलनानंतर अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी किर्ती किरणपूजा यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी खातेदारांना आश्वस्त करत सांगितले की, “मी या प्रकरणावर आधीपासून लक्ष ठेवून आहे. कालच जिल्हा उपनिबंधकांना सूचित केले असून, येत्या सोमवारी बँकेचे संचालक, खातेदार, ईडी अधिकारी आणि अन्य यंत्रणांची बैठक घ्यायचा निर्णय घेतला जाईल.”
या बैठकीच्या प्रतीक्षेत आता ठेवीदार असून, ठोस तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, यावेळी निवेदनात ठेवीदारांनी संचालक मंडळ बरखास्त करा, मालमत्ता जप्त करा, आणि दोषींना अटक करा अशा ठोस मागण्या केल्या आहेत.
संघटनेचे नेतृत्व विश्वासार्ह – ठेवीदारांचा निर्धार
सर्व ठेवीदारांनी एकमुखीपणे सांगितले की, “अनिल दादा जगताप जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.” त्यामुळे बँकेच्या गैरप्रकाराविरोधातील लढा आता अधिक तीव्र आणि संघटित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244