धाराशिव (प्रतिनिधी): भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघात काही नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले असले तरी मतदारांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. या मतदारसंघातील जनता ही स्वाभिमानी असून, गुत्तेदारांची टोळी जरी इतर गटात प्रवेश करत असली, तरी खरे मतदार मात्र अजूनही शरद पवार साहेबांच्या सोबतच आहेत, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
आजच माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
“३५ हजार मतांनी पराभूत झाल्यानंतरही पवार साहेबांनी त्या व्यक्तीस पुन्हा उमेदवारी दिली. इतर कुणाला ही तिकीट दिले असते, तर ती जागा निश्चितच पक्षाच्या ताब्यात राहिली असती. पक्षाच्या उपकारांची जाण न ठेवणाऱ्यांबद्दल मला फारसे बोलायचे नाही,” असे त्यांनी म्हटले.
“माजी आमदाराची खरी पात्रता आणि मतदारांशी त्यांचा खरा संपर्क येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल,” असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मी भूम, परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रत्येक निवडणूक ताकतीने लढवली जाईल.”
डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या जीवावर पाच वेळा उमेदवारी घेऊन शेवटी गद्दारी करणाऱ्याला जनता नक्कीच माफ करणार नाही. अशा व्यक्तीला हद्दपार केल्याशिवाय मतदार शांत बसणार नाहीत.”
येत्या काळात शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गावोगावी व तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल आणि मोठ्या मेळाव्याचं आयोजनही लवकरच केलं जाईल, असे त्यांनी जाहीर केले.