प्रतिनिधी, कळंब : वक्फ सुधारणा विधेयक 2025 च्या विरोधात कळंब तालुक्यातील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली असून, शुक्रवारी कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. कुल जमात तंजीम कळंब शहर व तालुकाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून निवेदन सादर केलं असून, त्या निवेदनात म्हटलं आहे की, “वक्फ सुधारणा विधेयक 2025 लोकसभा व राज्यसभेत घाईगडबडीत मंजूर करण्यात आलं असून, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ते कायदात रूपांतरित झालं आहे. हा कायदा देशातील 30-35 कोटी मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो.”

निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “या कायद्यातील तरतुदी संविधानातील कलम 21, 25 आणि 26 च्या विरोधात असून, धर्म स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांक हक्कांवर आघात करतात. देशात सुमारे 9 लाख एकर वक्फ जमिन व इतर संपत्ती मुस्लिम समाजाने समाजहितासाठी दान केली आहे. ही मालमत्ता सरकारच्या ताब्यात नसून, तिचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे वक्फ बोर्डाकडे आहे.”
विधेयकाच्या विरोधातील प्रमुख मुद्दे:
- जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ संपत्तीबाबत निर्णय अधिकार देणे
- वक्फ बोर्डावर दोन गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती
- वक्फ न्यायाधिकरणाचे अधिकार कमी करणे
- वक्फ संपत्ती दानासाठी कठीण अटी लावणे
- सर्वे अधिकार रद्द करणे

“हा कायदा मोठ्या उद्योगपती, संस्था आणि गैरमुस्लिम खाजगी व्यक्तींना वक्फ जमिनीचा हस्तांतरण करण्याच्या हेतूनेच आणला गेला आहे,” असा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मागणी :
“भारत सरकारने हा विधेयक त्वरित मागे घ्यावा, जेणेकरून देशातील सामाजिक समरसता, सौहार्द आणि शांतता टिकेल. अन्यथा, देशभर तीव्र आंदोलनाचा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.













Users Today : 27
Users Yesterday : 67
This Month : 1819
Total Users : 27247