धाराशिव | भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री ना. नितेश राणे यांचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा शनिवारी संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण करत विरोधकांना इशारा दिला आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना भरली.
“कुणी जास्त किरकिर केली, तर त्याला सोडणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना नाव न घेता दिला. ते प्रतिष्ठान भवन येथे बोलत होते.
भाजपच जिल्ह्यात वर्चस्व वाढवा – कार्यकर्त्यांना आदेश
राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजप हा धाराशिव जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष असायला हवा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत 2029 मध्ये चारही आमदार व खासदार भाजपाचे असावेत, अशी अपेक्षा त्यांनी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडून व्यक्त केली.

“बदलीची चिठ्ठी तुमच्या हाती येईल!” – अधिकाऱ्यांनाही सुनावले
जिल्हा नियोजन समितीवरील स्थगितीवर बोलताना राणे म्हणाले, “मुख्यमंत्री भाजपचा आहे, त्यामुळे कुणाचीही एकाधिकारशाही चालणार नाही. कार्यकर्त्यांना डावलून निधी वाटला, तर आम्ही गप्प बसणार नाही.”
ते अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “भाजपला विचारात न घेता जर काही केलं, तर बदलीची चिठ्ठी हातात आल्यावर वाचवायला कोणीही येणार नाही.”
कट्टर हिंदुत्वाचा आग्रह

स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या राणेंनी कार्यकर्त्यांना मोहल्ल्यांपेक्षा पाच हिंदू घरांमध्ये जाऊन हिंदुत्व समजावून सांगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मी हिंदुत्व घेऊन राज्यभर फिरतोय, आणि मतदारांनी मला निवडून दिलं आहे.”
तळ्यांवर भाजप कार्यकर्त्यांचा ताबा हवा
मत्स्य व्यवसाय विभागाच्या संदर्भात बोलताना राणे म्हणाले की, “जिल्ह्यातील तळ्यांवर संस्था तयार करून त्या भाजप कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिल्या पाहिजेत. थोडं उन्नीस-बीस करायचं असेल तर त्यासाठी मी आहे.”
“माझा एकच बॉस – तो मुंबईत आहे”
कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करताना राणे म्हणाले, “मी कुणाचंही ऐकत नाही. माझा एकच बॉस आहे – तो मुंबईत वर्षा बंगल्यावर बसतो.”
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले. व्यासपीठावर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,ना. नितेश राणे यांचे खाजगी सचिव संतोष राऊत,ॲड.मिलिंद पाटील,माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील,नितीन काळे,अनिल काळे,ॲड. नितीन भोसले,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, युवराज नळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252