- देवळाली येथील जाहीर सभेतून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा विरोधकांवर घणाघात
- या भागातील ३४ हजार एकर शेतजमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सावंत

आरसोली/देवळाली गेली ३५ वर्षे कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पाणी विरोधकांना या मतदारसंघात का आणता आले नाही? असा खडा सवाल करून, यांच्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघातील घरटी एक एकजण पोट भरण्यासाठी पुण्यात गेला आहे. जेथे पाऊस पडत नाही, तेथे यांनी धरणे बांधली. पर्जन्यमान कमी असल्याने धरणं भरणार कशी? त्यातही कहर म्हणजे धरणाच्या अगोदर कॅनॉल बांधले. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणणार म्हणून गेली ३५ वर्षे यांनी बॅनरवरच पाणी दाखवलं. बॅनर पाहून पाणी येणार या आशेवर अनेकांची लग्नं झाली, तरी पाणी आलं नाही. यांनी फक्त लोकांना फसविण्याचं काम केलं, अशी घणाघाती टीका ‘महायुती’चे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली.

आरसोली, सावरगाव, दरे, देवळाली येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारी (दि.१२) रात्री देवळाली येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. तसेच, आरसोली येथेही उपस्थित नागरिकांना संबोधित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, की गेल्या अडिच वर्षात विकासाची गंगा या भागात आणली असून, कुठल्याही व्यक्तीने यापुढे आपले गाव सोडू नये. होत नाही, हा शब्दच माझ्या डिक्शनरीत बसत नाही. आरसोलीला प्रतीभूमसारखे बनवणार असून, जनतेची सेवा करण्याचा मला पांडुरंगाचा आदेश आहे, म्हणून ही कामे मी करू शकलो. इथले प्रस्थापित हे वतनदार होते, आणि माझा हा संघर्षाचा वारसा येथील विस्थापितांसाठी आहे. आपल्या मतदारसंघात गेली २५ वर्षे सत्ता एकाच घरात होती, त्याचा लेखाजोखा आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. तब्बल ३५ वर्षानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरणातील आपल्या हक्काचे पाणी सीना कोळेगाव धरणात येत्या गुढी पाडव्याला पडणार असून, येथील ३४ हजार एकर जमीन बागायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाण्याचा प्रश्न कायमचाच सोडवायचा असेल तर पुढची पाच वर्षे देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहनही प्रा. तानाजीराव सावंत यांनी केले.

ग्रामपंचायतही आपल्या ताब्यात असली पाहिजेत, असे सांगून एका व्यक्तीच्या ताब्यात गाव कधीच देऊ नका. तसं केल्यास त्याच्या निर्णयात स्वार्थ येतो. असल्या गोष्टीला शिवसेनेत थारा नाही. नेत्याचे चारित्र्य व नियत साफ असेल तरच अधिकारी घाबरतात, आणि अधिकारी हे जनतेचे सेवक असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत, असेही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी याप्रसंगी उपस्थित जनसमुदयाला सांगितले.












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249