तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापुरातील पवित्र भूमीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ड्रग्स व्यापाराच्या वाढत्या सुळसुळाटावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून त्यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सध्या जनतेमध्ये जोर धरत आहे.
गेल्या चार–पाच वर्षांत युवकांमध्ये ड्रग्सचं व्यसन पसरल्याचं चित्र समोर आलं असून, अनेक निष्पाप तरुण याच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड होत आहे. तुळजापूरसारख्या श्रद्धास्थळाचे नाव आज राज्यभर ‘ड्रग्समुळे’ चर्चेत येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजकारण, ड्रग्स आणि ‘मौन’
स्थानिकांनुसार, या प्रकाराला केवळ गुन्हेगारी टोळ्यांनाच नव्हे, तर प्रभावशाली नेत्यांचं संरक्षण मिळालं असावं, असं बोललं जात आहे. इतक्या काळ या गोष्टी पोलिसांच्या आणि नेत्यांच्या नजरेआड राहणं शक्यच नाही, हे अधोरेखित होत आहे.
‘श्रेय’ नव्हे, ‘अपयश’!
ड्रग्स टोळीचा भंडाफोड झाल्यानंतर काही नेते “ही आमची कारवाई आहे, आमच्यामुळेच हे शक्य झालं” असं सांगत आहेत. मात्र, “हे तुमचं यश नाही, हे तुमचं अपयश आहे”, असं परखड मत शिवसेना प्रवक्ते अॅड. योगेश केदार यांनी व्यक्त केलं. “तुमच्या नेतृत्वात तरुण पिढी बिघडली, त्यामुळे हे श्रेय नव्हे, तर जबाबदारी आहे”, असंही ते म्हणाले.
नागरिक जागे झाले म्हणून सत्य बाहेर!
ड्रग्स प्रकरणाचा पर्दाफाश हा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं तात्काळ लक्ष वेधल्यामुळे शक्य झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनीही कार्यवाहीस गती दिली असून, ड्रग्स रॅकेटचे मूळ उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे.
स्वार्थी राजकारणाचा जिल्ह्याला शाप
धाराशिव हा जिल्हा विकासात मागे राहिला, यामागे “फक्त आमच्याच हातून सर्व काही व्हावं” अशी राजकीय वृत्ती कारणीभूत आहे,” असं म्हणत अॅड. योगेश केदार यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर टीका केली. “शहरातील नेते संपवून ‘मांडलिक’ तयार करायचे हे राजकीय तंत्र आता जिल्ह्याला परवडणारे नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.
“विकास कोणासाठी?” – केदार यांचा सवाल
“जर आमच्या भावी पिढ्याच ड्रग्समध्ये बरबाद होणार असतील, तर तो विकास कशासाठी आणि कोणासाठी?”, असा सवाल अॅड. योगेश केदार यांनी उपस्थित केला. “स्वार्थी राजकारणाच्या तावडीतून तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याची मुक्तता होणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषद घेण्याचा इशारा
या संपूर्ण प्रकरणामागील खरे आका कोण आहेत हे उघड करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा विचार असल्याची माहिती अॅड. योगेश केदार यांनी दिली आहे. “वेळ पडल्यास, नावासकट सविस्तर माहिती समोर ठेवली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
– अॅड. योगेश केदार
प्रवक्ता-शिवसेना
मो. 9823620666












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244