पुणे राजकीय कट्टा वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून थोडेसे अलिप्त असलेले माजी आरोग्यमंत्री आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे काल रात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी थेट पुण्यातील डॉ. सावंत यांच्या निवासस्थानी दिलेली अचानक भेट.
या भेटीमुळे डॉ. सावंत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. “साहेब पुन्हा मंत्री होतील का?” असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात घोळत असून, मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाची शक्यता मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

डॉ. तानाजी सावंत यांना मागील सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती, मात्र सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर ते जवळपास दहा महिन्यांपासून मतदारसंघात फारसे सक्रिय दिसून आले नाहीत. तरीही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रीपदाबाबत आशा कायम ठेवली होती.
दरम्यान, कालच धाराशिवमध्ये शिवसेनेचे निरीक्षक राजन साळवी यांनी भेट दिली होती. या भेटीदरम्यान भूम शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी उघडपणे पक्षातील काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर काही तासांतच एकनाथ शिंदेंनी डॉ. सावंत यांच्या निवासस्थानी दिलेली भेट – ही केवळ योगायोग होती की रणनीतीचा भाग, यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
राजकीय जाणकारांचे मत आहे की, या भेटीद्वारे शिंदे गटात अंतर्गत असंतोष नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच सावंत यांना पुन्हा सक्रिय करून त्यांचं अनुभवाधारित नेतृत्व मंत्रिमंडळात पुन्हा वापरण्याची तयारी सुरु आहे.
एकंदरीत, डॉ. तानाजी सावंत यांचे मंत्रीपद पुन्हा मिळणार का? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल, मात्र त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या ‘व्हीव्हीआयपी’ भेटीने राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला आहे.