जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक मध्ये सकारात्मक लोकांच्या पाठीशी उभा राहणार
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत भूम, परंडा आणि वाशी या तीन तालुक्यांमध्ये “आरोग्यदूत” म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. राहुल घुले आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काही काळ राजकारणापासून दूर राहिल्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा राजकीय क्षेत्रात उतरतील, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
राजकारणात कोणताही नेता कायम मोठा किंवा छोटा राहत नाही. सातत्य, परिश्रम आणि लोकसेवा या तीन गोष्टींमुळेच यश प्राप्त होते, ही भूमिका डॉ. घुले यांची कायम राहिली आहे. सुमारे वर्षभराच्या विश्रांतीनंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय होऊन भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यांतील तेरा जिल्हा परिषद गटांमध्ये आपल्या विचारांच्या लोकांना सहकार्य करणार आहेत. तसेच भूम नगरपालिकेतही काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा त्यांचा मानस असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. अपेक्षित मते न मिळाल्याने काही काळ ते शांत राहिले, मात्र आता ती निराशा झटकून नव्या जोमाने लोकांमध्ये जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
‘राजकीय कट्टा’शी बोलताना डॉ. राहुल घुले म्हणाले,
“येणाऱ्या चार दिवसांत मी भूम येथे लोकांशी थेट संवाद साधणार आहे. भूम नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होतकरू आणि समाजकारणात रस असलेल्या लोकांना मी पूर्ण पाठिंबा देणार आहे. पाथरूड सुट्टा आणि वालवड हे जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव झाले असून, या भागातील अनेक नागरिक माझ्याशी संपर्क साधत आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मी त्यांच्याशी संवाद साधत आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये माझ्या विचारांचे लोक बळकट व्हावेत, यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे.”
चार दिवसांपूर्वी राजकीय कट्टा साप्ताहिकांमध्ये डॉ.राहुल घुले यांच्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती त्यानंतर डॉ.राहुल घुले यांनी राजकारणात येण्याचा विचार केला असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॉ. राहुल घुले यांच्या सक्रियतेमुळे भूम, परंडा आणि वाशी परिसरात राजकीय वातावरण रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244