मंत्रिपदाच्या अपेक्षा, पक्षांतर्गत संघर्ष, आणि जनतेपासून दुरावलेले लोकप्रतिनिधी – धाराशिवच्या राजकारणाची अस्वस्थ दिशा
धाराशिव राजकीय कट्टा विशेष
प्रत्येक लोकप्रतिनिधीचे एक स्वप्न असते — निवडून यायचे आणि मग मंत्रिपदाच्या खुर्चीकडे वाटचाल करायची. मात्र हे स्वप्न जेव्हा वास्तवात येत नाही तेव्हा उरते ती केवळ अस्वस्थता. धाराशिव जिल्ह्यात सध्या अशीच अवस्था बहुतेक लोकप्रतिनिधींची झाली आहे. एक खासदार आणि चार आमदारांचे प्रतिनिधित्व असलेल्या या जिल्ह्यात, बहुतेक लोकप्रतिनिधींना मंत्रिपदाच्या प्रतीक्षेने व्याकुळ केलं आहे.
राजकीय गणित आणि पक्षीय स्थिती
धाराशिव जिल्ह्यात सध्या पाच लोकप्रतिनिधी आहेत – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील (तुळजापूर), आ.डॉ.तानाजी सावंत (भूम -परंडा-वाशी),आ.कैलास पाटील (कळंब-धाराशिव) आणि आ.प्रवीण स्वामी (उमरगा-लोहारा) यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचं बरोबरीचं राजकीय प्रतिनिधित्व आहे.महाविकास आघाडीकडे एकी असली तरी महायुतीमध्ये ‘सबसे बड़ा कौन?’ ही स्पर्धा चांगलीच रंगली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर – स्थिरता पण अनिश्चितता

केंद्रात मोदी सरकार असल्याने खा.ओमराजे राजेनिंबाळकर यांना अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याने त्यांचं काम अडथळ्यांचं झालं आहे. मंत्रीपदाबाबत फारशी चर्चा नसली तरी विरोधात किती दिवस राहायचे अशी कार्यकर्त्यांची आर्तहाक देखील त्यांच्या कायम कानावर पडत असल्याची चर्चा आहे.
आ.डॉ.तानाजी सावंत-गमावलेलं मंत्रिपद आणि वाढती नाराजी

डॉ.तानाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री व पालकमंत्री. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या मतदारसंघाला भेट दिलेली नाही. कार्यकर्तेही नाराज आहेत. मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळेल या अपेक्षेने जनतेने त्यांच्याकडे पाहिलं, मात्र त्यांच्या नावाचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यामुळे त्यांची अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते.
आ.राणाजगजितसिंह पाटील – मंत्रिपद न मिळाल्याने खिन्नता

तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या राणा पाटलांना मंत्रीपदाची जोरदार अपेक्षा होती. त्यांच्या समर्थकांनी तर नवस बोलून तयारी केली होती. पण त्यांना केवळ ‘मित्रा’ चे राज्य उपाध्यक्षपद मिळालं. त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे आणि पाटील स्वतःही अस्वस्थ आहेत.
आ.कैलास पाटील-सत्तेबाहेर राहण्याची सल

महाविकास आघाडीच सरकार आ.कैलास पाटील यांना यावेळी सत्तेबाहेर राहावं लागलं. 2019 ते 2024 या काळात त्यांना “नशीबवान आमदार” म्हणून पाहिलं गेलं, पण सत्तेतील परिवर्तन न झाल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा आल्या आणि त्यामुळे तेही अस्वस्थ आहेत.
आ.प्रवीण स्वामी – समाधानाचा सूर

प्रवीण स्वामी यांनी शिक्षकपदाचा राजीनामा देऊन थेट निवडणुकीत उडी घेतली आणि अवघ्या 28 दिवसांत आमदार बनले. इतरांप्रमाणे त्यांना मंत्रिपदाची हुरहुर न जाणवता, सध्या आहे त्या पदावर समाधान मानणारे ते एकमेव आमदार आहेत. खरंतर शिक्षक ते आमदार असा त्यांचा प्रवास झाल्यामुळे त्यांना अगोदरच पदोन्नती भेटलेले आहेत त्यामुळे ते आहे त्या पदात खुश असलेले दिसून येत आहेत.
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही पराभवाची हुरहुर

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव अवघ्या चार हजार मतांनी झाला. त्यांनी पुन्हा निवडून आले असते तर मंत्रीपद निश्चित होतं, अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे त्यांची अस्वस्थता निवडणुकीनंतर अधिकच वाढली आहे.
पदावर समाधान, कार्यक्षमतेतून संधी
प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा असतात, पण लोकांनी निवडून दिलेलं पद जबाबदारीचं असतं. मंत्री होण्याची इच्छा प्रत्येकाची असू शकते, पण जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणं हाच खरा मंत्रिपदाचा मार्ग असतो. आज सत्तेत नसलेल्या लोकप्रतिनिधींनी जर प्रामाणिकपणे काम केलं, तर उद्याचं सरकार त्यांचंच असू शकतं.
जनता नेहमी कार्य पाहते, चेहरा नव्हे. त्यामुळे अस्वस्थतेचा बाऊ करण्यापेक्षा, जनतेत मिसळून त्यांच्या अपेक्षांचं ओझं उचलणं हेच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे.













Users Today : 67
Users Yesterday : 55
This Month : 1566
Total Users : 26994