धाराशिव, दि. 3:
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) व युवा सेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते आनंद पाटील यांची युवा सेनेच्या धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही निवड पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, तसेच खासदार श्रीकांत शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, राज्य सचिव किरण साळी, व मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या हस्ते आनंद पाटील यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, औसा, उमरगा, लोहारा, बार्शी आणि तुळजापूर या तालुक्यांत संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत होत असून, आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.