धाराशिव – धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या २०२५–२०२९ पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत राणा पाटील यांच्या पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकून विरोधकांचा सुपडासाफ केला आहे.
या फेडरेशनवर सुरुवातीपासूनच डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांचे चिरंजीव व सध्याचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही हे वर्चस्व यशस्वीपणे टिकवले आहे.
या निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दिल्लीहून एका मतदाराला विमानाने आणले गेले, हे विशेष लक्षवेधी ठरले. मात्र, आमदार राणा पाटील यांनी आखलेली काटेकोर रणनिती आणि संघटनशक्ती यापुढे विरोधक अपयशी ठरले.
आ. पाटील यांच्या गटाच्या ४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित ९ जागांसाठी मतदान झाले, त्यात ८ जागा मोठ्या मताधिक्याने राणा पाटील गटाच्या ताब्यात गेल्या, तर लोहाऱ्याची एकमेव जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली.
या विजयामुळे जिल्हा मजूर फेडरेशनवर राणा पाटलांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249