धाराशिव-जगन्नाथ पुरी, ओरिसा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या कु. तन्वी भोसले हिने देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये आपली छाप पाडत, ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ पटकावला आहे. हा पुरस्कार खो-खो या पारंपरिक भारतीय खेळातील सर्वोच्च वैयक्तिक गौरवांपैकी एक मानला जातो.
कु. तन्वी ही श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थीनी आहे. तिच्या अथक मेहनतीला आणि उत्कृष्ट कामगिरीला मिळालेली ही पावती केवळ तिच्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामागे तन्वीचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, तसेच खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. संपूर्ण संघाने उत्कृष्ट समन्वयाने खेळ करत जिल्ह्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकवला.
या यशाबद्दल कु. तन्वी भोसले हिला, तिच्या टीमला, प्रशिक्षकांना, व्यवस्थापकांना व खो-खो असोसिएशनला जिल्ह्यातून व राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
धाराशिव जिल्हा आता केवळ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली छाप उमटवत आहे, हे या यशाने पुन्हा सिद्ध केले आहे.













Users Today : 28
Users Yesterday : 67
This Month : 1820
Total Users : 27248