धाराशिव : जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती 21 एप्रिलपूर्वी हटवली गेली नाही, तर शिवसेना आंदोलनाच्या मार्गावर उतरेल, असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला आहे. ते धाराशिव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विकासकामांना खीळ – राजकारणाच्या कुरघोडीचा आरोप
पाटील म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर स्थगिती देणे म्हणजे जिल्ह्याच्या प्रगतीवर घाला आहे. हे राजकीय कुरघोडीचे खेळ थांबवले पाहिजेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ मंत्री आहेत. मात्र काही नेते पडद्यामागून त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचे प्रयत्न करत आहेत.”
“युतीत राहायचं की नाही, हे ठरवावं लागेल”
महायुतीतील काही नेत्यांनी पालकमंत्र्यांविषयी अपप्रचार सुरू केला असून, हे प्रकार सुरूच राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना सोबत राहावी की नाही, यावर विचार केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा डाव सुरू आहे. भाजपकडून असे प्रयत्न सुरू असतील, तर हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
“निधी वाटपात राजकारण नको”
“लोकप्रतिनिधींना निधी वाटपाचे सूत्र वरिष्ठ स्तरावर ठरवले गेले आहे. तरीही अडवणूक होत असल्यास, हे राजकीय सूडाचेच लक्षण आहे,” असे पाटील म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या कामात कोणतीही टक्केवारी नाही, ही बदनामीखोर चर्चा थांबवावी, असे ते म्हणाले.
21 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
“शासनाने 21 तारखेपूर्वी स्थगिती हटवली नाही, तर शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा सुधीर पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, “या मागणीसाठी सोमवार (7 एप्रिल) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार आहे.”
पार्श्वभूमी :
धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा व अन्य स्थानिक कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अचानक जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत वादळ उठले असून, शिवसेनेने थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे.












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249