वाढदिवस व्यक्तीविशेष
सक्षम महिला,सक्षम कुटुंब… कौशल्य युक्त महाराष्ट्र. युवकांसाठी रोजगार युक्त महाराष्ट्र.. हा ध्यास घेऊन महिला व युवकांसाठी अहोरात्र परिश्रम करणा-या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हसेगाव (शि.) येथील डॉ. सरोजनी संतोष राऊत यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा हा आढावा

जे का रंजले गांजले,
तयाशी म्हणी जो आपुले !!
तोची साधु ओळखावा,
देव तेथेची जाणावा !!
असे संत तुकारामांनी म्हटले आहे आणि असेच कार्य एखाद्या शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित महिला करत असेल तर ते समाजासाठी दिलासादायकच आहे असे म्हणायला हरकत नाही.
ज्यांच्या नावाचा समानार्थी अर्थच कमळ आहे.कमळाप्रमाणे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन बी.एच.एम.एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन केवळ सामाजिक कार्याची आवड असल्याने एम.एस.डब्ल्यू. ची पदवी घेऊन धाराशिव जिल्ह्यात सामाजिक कार्याचा झंझावात निर्माण करणाऱ्या डॉ.सरोजनी संतोष राऊत यांच्या सामाजिक कार्यासह राजकीय कार्याचा आढावा या लेखात घेतला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव (शि.) या छोट्याशा गावच्या रहिवाशी असलेल्या डॉ.सरोजनी संतोष राऊत यांचे माहेर सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी तालुक्यातील जामगाव. वडील औदुंबर व आई सुवर्णा आवटे या शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या सरोजनी यांची मोठी बहीण विकलांग असल्याने शेतकऱ्यांच्या व महिलांच्या समस्या जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या होत्या.लहानपणी मला या समाजासाठीच काम करण्याचा सकारात्मक असा चंग बांधला. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पुर्ण झाले तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुरूड येथील जनता विद्यालयात पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण लातूर येथे पुर्ण केले.

त्यांचा विवाह कळंब तालुक्यातील हसेगाव (शि.) येथील श्री संतोष भागवत राऊत या उच्चशिक्षित आणि संवेदनशील अधिकाऱ्याशी झाला. संतोष राऊत यांचे वडीलही शिक्षक व शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनाही शेती आणि मातीची विशेष ओढ होती. डॉ सरोजनी यांना असलेली सामाजिक कार्याची ओढ पाहून संतोष राऊत यांनी लग्नानंतर ही एम.एस.डब्ल्यू.चे शिक्षण सुरूच ठेवले. पदवी घेतल्यानंतर डॉ. सरोजनी यांनी मुंबईत संसाराचा गाडा हाकत आपला मोर्चा गावाकडे म्हणजेच धाराशिव जिल्ह्याकडे वळविला. त्यांनी गावात श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करून 2016 पासून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. त्यांनी देव,देश आणि धर्माचा सेवाभाव हे वृत्त हाती घेऊन आपल्या कार्यास सुरवात केली. गावातील व तालुक्यातील ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले योगदान दिले अशा स्वातंत्र्यसैनिकांचा व वारसांचा त्यांनी सन्मान करून त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याचे कार्य डॉ. सरोजनीताईंनी केले.
कोरोना काळात सर्व जग भयभीत होते अशा वेळी त्यांनी घेतलेली वैद्यकीय पदवी व सामाजिक पदवीच्या अनुभवाचा फायदा घेत जनजागृती केली. तसेच सर्वरोग निदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मे वाटप, आरोग्य विषयक शिबिर, अशा विविध सामाजिक उपक्रमाचा सपाटा लावला. तसेच धाराशिव जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागातील दुष्काळ कायमचा संपावा म्हणून त्यांनी धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात गाव तिथे शंभर झाडे लावण्याचा संकल्प केला असुन त्यांनी त्याचे वाटप ही सुरू केले आहे.

कळंब तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळ होता त्याचे वास्तव लक्षात घेऊन त्यांनी विविध गावात पाणी साठवण्यासाठी सिंटेक्स टाकी भेट दिली याचा उपयोग ग्रामीण भागातील गावांना झाला. आपल्या भागातील मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील शाळेत वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवणे अशा स्पर्धांचे आयोजन व बक्षिस वितरणाचे कार्यक्रम त्या सातत्याने घेत असतात.तसेच त्यांनी अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो वह्यांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले आहे. तसेच 350 व्या शिवजनमोतसवानिमित त्यांनी तब्बल बावन्न हजार शिवसंदेश, छत्रपती शिवराय आणि त्यांचे विचार घरोघरी पोहोच करण्याचे काम केले. तसेच २२जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे कळंब शहरात नियोजन व प्रसादाचे आयोजन केले होते. प्रभू श्रीराम मंदिराचा फोटो गावोगावी मंदिरात लावण्यात आले.अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून समाजात त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.

धाराशिव जिल्ह्यातील विशेष करून कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात श्रीलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेना धर्मवीर आध्यत्मिक सेना यांनी “राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार २०२४” देऊन डॉ.सरोजनीताईंचा सन्मान केला. याबरोबरच धाराशिव येथील “राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था” यांनीही डॉ.सरोजनीताईंना ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जिल्ह्यात महिलांचे मजबूत संघटन उभा केले. या कामाची पोहोच म्हणून पक्षाने डॉ.सरोजनी राऊत यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.सामान्य कार्यकर्ती ते भारतीय जनता पार्टीची जिल्हा उपाध्यक्षा हा सर्वासाठी अचंबित करणाराच प्रवास होता. एक महिला म्हणून ही जबाबदारी देवून पक्षाने ताईकडे सोपवलेली जबाबदारी व विश्वास हा खूप महत्वाचा होता. ताईंनी एक वर्षभरामध्ये जवळपास कळंब तालुका ढवळूनच काढला. गावोगावी प्रवास, महिला संघटन, वैयक्तिक संपर्कावर भर दिला.

२०२२ ते २४ च्या काळात जबाबदार कार्यकर्ती या नात्याने दायित्व प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंत डॉ.सरोजनी यांनी युवकांसाठी कौशल्यावर आधारीत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले.ग्रामविकास,पर्यटन विकास, सांस्कृतिक विकास, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तिर्थविकास क्षेत्र, अल्पसंख्याक विकास, रोजगार हमी, शेत रस्ते, पेवर ब्लॉकची कामे, सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण इ. प्रकारच्या विविध विकास कामांना गती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या मध्यामतून डी.पी.डी.सी. अंतर्गतच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसली. ग्रामीण भागातील विकासावर भर दिल्या व सर्वांना घेऊन सर्वसमावेशक विकासाला वेग दिला. यातूनच जिल्हयातल्या विविध समस्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला.

धाराशिव – कळंब मतदारसंघात नवनवीन विकास योजना, नवे विस्तारीकरण, पाणी टंचाई यासंदर्भात अशा अनेक विषयांवरील ताईंनी अभ्यास पूर्ण योजना राबवून जवळपास ६० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला. आपल्या धाराशिव जिल्ह्यातून मंत्रालय, मुंबई किंवा इतर कामानिमित्त येणाऱ्या आजपर्यंत २८०० पेक्षा अधिक धाराशिवकरांची मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांनी केली. या कामाची व्याप्ती केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा गावच्या हद्दीपुरते मर्यादित न ठेवता कळंब धाराशिव मतदारक्षेत्रात विद्यार्थी, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक, दिन-दलित, वंचित, दिव्यांग यांच्यासाठी विशेष कार्य केले आणि त्यामुळेच जिल्हयातले बहुतांश लोक जोडले गेले. भारतीय जनता पक्षाने कार्यावर विश्वास दाखवत नुकतेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास मराठवाडा विभाग सहसंयोजक म्हणून दायित्व दिले.

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना महिलांना समजावी म्हणून त्या स्वतः प्रवास करून निरसन करत आहेत. मोबाईल ॲपद्वारे किंवा पोर्टल द्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे.

तरीही संस्थेच्या माध्यमातून धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात घरोघर जाऊन या योजनेसंदर्भात महिलांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे काम करत आहेत.धाराशिव-कळंब मतदार संघात हासेगाव (शि.),शिराढोण,नायगाव,कसबे तडवळा,पळसप, ढोकी, येडशी, जायफळ, निपाणी, वाठवडा, गौरगाव, इ. अनेक गावांमध्ये कार्यकत्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी योजनेची विस्तृत माहिती पोहोचवणे तसेच मोबाईल ॲप्लीकेशन व ऑफलाईनद्वारे फॉर्म भरून घेत आहेत. ही योजना घरोघरी पोहचावी म्हणून त्या अहोरात्र परिश्रम घेत आहेत व महीलांना योजनेची माहिती देत आहेत. त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे ग्रामीण महिलांना त्या मोठा आधार ठरत आहेत.

तसेच ग्रामीण भागातील रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पक्षश्रेष्ठींकडून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्या आठवड्यातील एक दिवस जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे डॉ.सरोजनी राऊत यांची लोकप्रियता धाराशिव जिल्ह्यात झपाटय़ाने वाढत आहे. अशा सुशिक्षित महिला राजकीय, सामाजिक कार्यात पुढे आल्या तर समाजाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहाणार नाही. डॉ.सरोजनी संतोष राऊत यांच्या सामाजिक व राजकीय कार्यास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
डॉ.सरोजनी राऊत यांना वाढदिवसाच्या राजकीय कट्टाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा……..














Users Today : 44
Users Yesterday : 55
This Month : 1543
Total Users : 26971