मनसेचा ठेकेदारांना इशारा : “दर्जेदार काम करा, नाहीतर हात जोडून सांगू”-शहराध्यक्ष निलेश जाधव
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव शहरातील रस्ते व नाली कामांसाठी मंजूर झालेला तब्बल १४० कोटी रुपयांचा निधी अखेर राज्य सरकारकडून मंजूर झाला आहे. दीड वर्षांपासून हा निधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक राजकारणाच्या वादात अडकला होता. या मंजुरीमुळे आता धाराशिवकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी ठेकेदारांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “जो कोणी ठेकेदार अथवा कॉन्ट्रॅक्टर धाराशिव शहरातील रस्त्यांचे काम करीत आहे, त्यांना मनसेची हात जोडून विनंती आहे की शहरातील मुख्य रस्ते व नालीचे काम अत्यंत दर्जेदार व्हावे. जर काम हलगर्जीपणे किंवा निकृष्ट दर्जाचे झाले, तर आम्हालाही हात सोडून ही सांगता येते.”
शहरातील ५९ प्रमुख रस्त्यांसाठी दीड वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय वादांमुळे या कामांना विलंब झाला. या काळात धाराशिवकरांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना अक्षरशः हाल सोसावे लागले.
“जनतेला दीड वर्ष खड्ड्यांमधून फिरवल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर कार्यारंभ आदेश काढले जात आहेत. श्रेयवादात अडकून राहण्याऐवजी शहराचे रस्ते दर्जेदार कसे होतील यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
निवडणुकीचा काळ लक्षात घेऊन हा निधी मंजूर झाल्याचा आरोप करत जाधव म्हणाले, “धाराशिवची जनता सर्व पाहत आहे. जर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले, तर नागरिक या हलगर्जीपणाचा वचपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काढल्याशिवाय राहणार नाही.”













Users Today : 17
Users Yesterday : 77
This Month : 1593
Total Users : 27021