मुंबई (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यातील बीड–सोलापूर महामार्गावर वाढत असलेल्या चोऱ्या व लूटमारीच्या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची गंभीर दखल घेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
महामार्गावरील येडशी ते पारगाव या दरम्यान, तेरखेडा, येरमाळा आणि परिसरात, चालत्या अथवा थांबलेल्या वाहनांमधून माल चोरी, प्रवाशांना अडवून लूटमार यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवासीवर्गामध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
या घटनांची माहिती शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, युवासेना संपर्कप्रमुख नितीन लांडगे आणि कार्यकर्ते पांडुरंग घुले यांच्या मार्फत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आली. या माहितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत, परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले.
“महामार्गावरील चोरी व लूटमारीच्या घटनांना आळा घालणे अत्यावश्यक आहे. संबंधित गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करा,” असे पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले.
महामार्गावरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून हवे असल्यास जिल्हा नियोजन निधीतून यासाठी आवश्यक निधी दिला जाईल.त्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.













Users Today : 18
Users Yesterday : 81
This Month : 1675
Total Users : 27103