आजचा दिवस एक विशेष पर्वणी घेऊन आला आहे-कारण आज आहे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा.डॉ.पदमसिंह पाटील साहेबांचा वाढदिवस. समाजसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि राजकारण या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या या थोर नेत्याला आज आपण लाखो कृतज्ञ मनांतून शुभेच्छा देत आहोत.

सर्वसामान्यांतून उठलेलं असामान्य व्यक्तिमत्त्व
तेर (ता.जि. धाराशिव) या गावात जन्मलेले डॉ.पाटील साहेब यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा, आणि समाजकारण या क्षेत्रांत आपली प्रतिभा सिद्ध केली. एम.बी.बी.एस. हे बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी केवळ डॉक्टर म्हणून काम न करता, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणे हेच आपले जीवनध्येय मानले.
समाजकार्यातून राजकारणात प्रवेश

डॉ. पाटील यांची समाजकार्यातील ओळख इतकी प्रभावी होती की 1974 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर 1978 ला पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर कायम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर रोशन केले. त्यांनी विधानसभेपासून ते संसदेपर्यंत प्रतिनिधित्व करत अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाच्या असे गृहमंत्री,पाटबंधारे, विधानसभा उपाध्यक्ष अशी सर्व महत्त्वाची पदे उपभोगली व या सर्व पदांचा फायदा धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकरिता करून घेतला. आजही धाराशिव जिल्ह्याचा पाटबंधारे पॅटर्न राज्यात आदर्श मानला जातो.जलसिंचन करण्यासाठी या पाटबंधारे विभागाचा उपयोग मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्याला झाला म्हणूनच आज जिल्ह्यात जवळपास 18 ते 20 सहकारी व खाजगी साखर कारखाने आहेत. एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या या जिल्ह्यावर पाटबंधारे विभागाच्या मंत्री पदाच्या जोरावर अनेक जलसिंचनाचे मोठे प्रकल्प हाती घेत डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी पूर्ण केले.

सामाजिक भान आणि शिक्षणाची दूरदृष्टी
आरोग्य, शिक्षण आणि जलसंधारण यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या कार्यात पाहायला मिळतो. वैद्यकीय सेवेतून सुरुवात करत, त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे ग्रामीण भागात उभारले.
यातून हजारो विद्यार्थी शिक्षित झाले, तर हजारो कुटुंबांच्या आयुष्याला दिशा मिळाली. ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्यांवर त्यांनी काटेकोर उपाययोजना राबवल्या.
माणुसकी हीच ओळख
डॉ. पाटील साहेबांचा कार्यशैलीतील मुख्य गाभा म्हणजे माणुसकी आणि संवाद. सत्तेच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी कधीही जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमी सामान्य माणूस होता.

शुभेच्छांचा वर्षाव
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. अनेक मान्यवर, सहकारी, विद्यार्थी, आणि सामान्य नागरिक त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन अनेक तरुण पुढे येत आहेत.
मा.डॉ.पदमसिंह बाजीराव पाटील हे केवळ एक नेते नाहीत, तर एक युगप्रवर्तक आहेत.त्यांच्या नेतृत्वगुणांचा, समाजसेवेच्या अथक ध्यासाचा आणि माणुसकीच्या झऱ्याचा आपण सगळे आदर करतो.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अजूनही अधिक समाजहिताच्या संधी लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

“माझं भाग्य की, या अद्वितीय माणसासोबत २४ वर्ष कार्य करण्याची संधी मला लाभली… त्याबद्दल मी ईश्वराचे मनापासून आभार मानतो
मनोगत उर्फ पिंचू भैय्या शिनगारे
खामगाव ता.जि.धाराशिव












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252