धाराशिव, ता. ७ एप्रिल :
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत राज्य सरकारने ४०३ कोटी ८९ लाख रुपयांच्या भव्य शासकीय वैद्यकीय संकुल प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ही आनंदवार्ता जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक मोलाची भेट ठरली आहे. हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची माहिती धाराशिवचे भाजप आमदार आणि ‘मित्र’चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

महाविद्यालय व रुग्णालय संकुलाची रूपरेषा
या प्रकल्पांतर्गत धाराशिव येथे १०० विद्यार्थ्यांची क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, तसेच विविध अत्यावश्यक पूरक इमारती उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ८ लाख २६ हजार चौरस फुट क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे.

यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल:
- वैद्यकीय महाविद्यालयाची आधुनिक वास्तू
- रुग्णालयाच्या सर्व सुविधा – ऑपरेशन थिएटर, आयसीयू, आपत्कालीन विभाग आदी
- मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृहे
- अधिष्ठात्यांचे निवासस्थान
- शिक्षक व कर्मचारी वर्गासाठी निवासी सुविधा
- विश्रामगृह, सुरक्षा व्यवस्था व इतर पूरक इमारती
जागेचे हस्तांतर व आराखडा निवड

या प्रकल्पासाठी जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची १२ हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून या संकुलाचा आराखडा निवडण्यात आला आहे. सदर आराखड्यावर आधारित सुधारित बांधकाम प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता, त्यास आता प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
शैक्षणिक विस्ताराच्या दिशा
फक्त वैद्यकीय महाविद्यालयापुरते मर्यादित न ठेवता, राज्य सरकारने या संकुलात भविष्यात इतर वैद्यकीय शाखाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार:
- सध्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयालगत असलेल्या अतिरिक्त जागेत आयटीआय स्थानांतरित करण्यात येणार आहे.
- त्यानंतर त्या जागेवर दंत महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, भौतिकोपचारशास्त्र, फार्मसी यांसारखे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
उच्च शिक्षणासाठी मान्यता – पदव्युत्तर अभ्यासक्रम
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘क्रिटिकल केअर मेडिसीन’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार असून, यामुळे जिल्ह्याला प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर्स लाभणार आहेत.
याशिवाय, यापूर्वीच महाविद्यालयाला डी.एन.बी. शल्यचिकित्सा (Surgery) आणि डी.एन.बी. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (Obstetrics & Gynaecology) या दोन विषयांत प्रत्येकी दोन जागांची मान्यता मिळालेली आहे. सध्या महाविद्यालयात सुमारे ३०० विद्यार्थी एमबीबीएसच्या विविध वर्षांत शिक्षण घेत आहेत.
जनतेसाठी मोलाची भेट – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन
या ऐतिहासिक निर्णयाबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, तसेच महायुती सरकारचे आभार मानले.
“जागतिक आरोग्य दिनी जिल्ह्याला ही मोठी भेट मिळाल्याचा मला आनंद आहे. धाराशिव जिल्हा वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल, अशी खात्री आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
हा प्रकल्प धाराशिवसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार असून, ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.













Users Today : 55
Users Yesterday : 55
This Month : 1554
Total Users : 26982